शरण
अनिरुद्ध कापरेकर
शरण गेलोय
मी आता,
माझ्यातल्या
सिद्धार्थ गौतमाला,
वास्तव
चाचपडणाऱ्या
शाक्यमुनिला,
ध्यानस्थ
घडलेल्या
बुद्धाला,
लयीतल्या
श्वासाला,
रक्तात ब्रह्म
घडवणाऱ्या
प्राणवायूला,
नकळत उमलणाऱ्या,
आणि सहज लोप पावणाऱ्या,
कोट्यावधी संवेदनांना,
विश्वाच्या अथांग
पसाऱ्याला,
अनादि-अनंत
अंधाराला,
विस्फोटात
जन्म-मृत्यु
पावणाऱ्या
अब्जावधी
ग्रह-ताऱ्यांना,
तहानलेल्या,
माझ्या नपुंसक
ज्ञानेन्द्रियांना,
भास-आभासात
रमणाऱ्या
माझ्या मनाला,
शरण गेलोय,
असण्याला,
शरण गेलोय,
नसण्याला,
न थांबणाऱ्या
प्रवाहाला,
तहाच्या त्या
एका क्षणात,
बुडुन गेली
बंदराकडे डोळे
लावलेली सारी
नाउमेद गलबतं,
विझून गेल्या
विजयाच्या
अहंकारी
आकांक्षा,
कोलमडुन पडले
खांद्यावरचे,
नकाशांचे
पारंपारिक ओझे,
नाहीसं झालं
विश्वानी
माझ्यासाठी
खरडलेलं पंचांग,
स्थिर-अस्थिराच्या
द्वंद्वातून पूर्णतया
मोकळी
झालेली
माझी नजर
आता त्या
अनिरुद्ध
नजरेला,
कसलाही
शोध
नाही!
कसलाही
शोध
नाही!
-अनिरुद्ध कापरेकर
No comments:
Post a Comment
प्रतिसाद