Friday, 18 October 2024

३.३ कविता - दान (अनिरुद्ध कापरेकर)

दान 

अनिरुद्ध कापरेकर




तू जितक्या
सहज
आणि
सुंदर नजरेने
न्याहाळतेस मला,
तितके
सहज आणि सुंदर
मला लिहिता
येईल का?

मी,
शब्दांचा भिकारी,
परत परत,
मान वळवून
तुझी ती
सहज,
सुंदर नजर
शोधतोय.
शब्दात पकडायला,
तुझ्याच शब्दांची
भीक मागत.

मिळणार नाही,
हे पुरेपूर माहीत
असून सुद्धा,

झोळी रिकामीच बरी,
हे पूर्णतया
उमजून सुध्दा.

ज्या दिवशी,
तुझ्या नजरेचा
ध्यास,
कायमचा सुटेल,
त्या दिवशी
तूच वळून
पहाशील मला,

कदाचित.

एखादी खूण
करशील,
आणि
तुझ्याच हाताने
फेकून देशील
माझी झोळी.

आणि त्या
निशब्द क्षणात,
देशील मला दान,
अनंत जन्मांचं.

जे शब्दांत
उमटताच
संपून जातं.

-अनिरुद्ध कापरेकर


5 comments:

  1. वाहवा क्या बात है ! तुझ्याच आवाजातील ऑडिओ मुळे कविता खूपच भावपूर्ण आणि प्रभावी झाली आहे. असेच लिहीत रहा.

    ReplyDelete
  2. वाह अनिरुद्ध .छान कविता आणि तुझ्याच आवाजात ऐकताना वेगळा आनंद . वासूकाका

    ReplyDelete
  3. खूप छान, काळजाला हात घालणारा भाव! अभिनंदन.

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर