Friday, 10 July 2026

२.८ ‘जन्नत- ए- काश्मीर’ का शापित नंदनवन? (रवी दाते)

‘जन्नत- ए- काश्मीर’ का शापित नंदनवन?

रवी दाते 

लहानपणी विविध कारणांमुळे करता न आलेली आणि गेली पंचवीस वर्षे आतंकवादामुळे पुढे पुढे ढकलली गेलेली काश्मीरची सहल अखेर येन केन प्रकारेण बुक झाली आणि पहेलगाम  हल्ला होण्याच्या एक वर्ष आधी सुखरूपपणे पारही पडली. नंदनवनाला भेट देण्यासाठी इतकी पुण्याई लागते याची कल्पना नव्हती. या पुण्याईवर भरोसा नसल्यामुळे म्हणा किंवा  इतक्या वर्षांच्या दहशतवादामुळे म्हणा, टूर स्वतंत्रपणे न करता केसरी बरोबर सामूहिकरित्या करण्याचे ठरवले.

इंडिगो विमानात 'राष्ट्रीय रायफल्स'मधील एक जवान आमचा सहप्रवासी होता. तो आपली ड्युटी जॉईन करण्यासाठी परत चालला होता. त्यांच्याकडून काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीबद्दल खूपच  माहिती मिळाली. त्याचप्रमाणे आम्ही बघणार आहोत त्या काश्मीरच्या दक्षिण भागापेक्षा उत्तरेकडील भाग अजून कसा अस्पर्शीत आणि सुंदर आहे, तसेच तेथील लोकही कसे आतिथ्यशील आहेत हेही कळले. तेथीलच काही स्थानिकांनी त्यांच्या आई-वडिलांना सांभाळून उत्तरेकडील काश्मीर कसं दाखवलं होतं हेही कळलं. त्यांच्याकडूनच पूर्वीच्या आतंकवादाची आणि स्टोन पेल्टींगची सुद्धा खातरजमा झाली. ह्याच लोकांना, कलम ३७० लागू केल्यानंतर टुरिझम वाढल्याने आपण पेल्टींग करून काय चूक करत होतो हे समजू लागले आहेत अशी फर्स्ट हॅन्ड इन्फॉर्मेशन ही मिळाली आणि आमच्या धास्तावलेल्या मनाला पुढील सहलीसाठी दिलासाही.

भारतातील दिल्ली, मंगलोर यासारख्या इतर विमानतळावर त्या त्या शहरांची वैशिष्ट्य दाखवणारी मॉडेल आहेत आणि तीच परंपरा  श्रीनगरलाही चालू आहे. नंदनवनातच  आल्याची खात्री पटवण्यासाठी विमानतळावर गोल फिरणाऱ्या सामान पट्ट्याच्या मध्यभागी  ‘शिकार्‍याचे’ ( बोटीचे) सुंदर मॉडेल  ठेवले आहे. परंतु अजूनही राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी त्याचा किंवा इतर कशाचाही फोटो काढण्यास विमानतळावर बंदी आहे, 

विमानतळापासून घाटापर्यंत येताना दिसलेले श्रीनगर आतापर्यंत पाहिलेल्या इतर विमानततळांबाहेरच्या परिसरापेक्षा खूपच कमी विकसित वाटले. आणि हेच दारिद्र्य इतरही बऱ्याच ठिकाणी जाणवत राहते. घाट म्हणजे जिथून शिकारे सुटतात तो थांबा. शहरातील बसथांब्यां प्रमाणे पंधरा-वीस बोटथांबे दाल सरोवराच्या घाटावर आहेत.

येथील टॅक्सीवाले, पोलीस पाठलाग करत असल्यासारखी गाडी हाणतात. आपल्या मागून पोलिसांची गाडी येत असेल तर त्यांना  वाट करून द्यावी अशी इतर अनेक देशात प्रथा आहे, पण काश्मीरमध्ये हा सक्त नियम आहे. ज्या हातांनी या पोलिसांवर गेली २५ वर्षे दगड फेकले त्याच हाताने स्टेरिंग वळवून त्यांना वाट मोकळी करून द्यावी लागते!!! किती याचना होत असतील त्यांना असं करताना, असा विचार माझ्या मनात येऊन गेला. 

दाल सरोवराच्या प्रथमदर्शनातच पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात तो हाच असल्याची खात्री पटली.खऱ्याखुऱ्या शिकाऱयांचं आणि दूरवर दिसणाऱ्या हाऊस बोटिंच दर्शन झाल्यावर ‘तारीफ करू क्या इसकी’ तसंच ‘काश्मीर की कली हूं मै’  अशा अनेक गाण्यांच्या आठवणी मनात दाटून आल्या. 


शिकारा म्हणजे येथील सरोवरातील वाहतुकीसाठी वापरली जाणारी छोटी बोट. ती आपल्याला दाल सरोवरातील बेटांवर किंवा मार्केटमध्ये शॉपिंगसाठी घेऊन जाते. तसेच काही पाण्यातील फेरीवाले, मुंबईतील लोकल ट्रेनमधील फेरीवाल्यांसारखे, त्यांच्या शिकार्‍यातून आपल्या शिकाऱ्याजवळ चहा किंवा कावा विकायला येतात. हेच शिकारे आपल्याला हॉटेलमध्ये म्हणजे हाऊसबोटीत घेऊन जातात. हाऊस बोट म्हणजे  तीन-चार कुटुंबांची राहायची सोय असणारे B&B. ब्रिटिशांनी त्यांच्या काळात तलावा तच मुक्काम करून  तलावाचा आनंद उपभोगण्यासाठी बांधलेले बोटीच्या आकाराचे घर त्यात घराप्रमाणे सर्व सोयी असतात; पण बोटीप्रमाणे त्या पाण्यावर न तरंगता किनाऱ्यावर कॅराव्हॅनसारख्या कायमच्या पार्क केलेल्या असतात.

हाऊसबोटीच्या बालकनीतून सकाळी दाल सरोवराचा सुंदर देखावा दिसायचा. बाहेरची हवाही खूप छान असायची. समोरच्या डोंगरावरच शंकराचार्यांचे मंदिर दिसायचे.सकाळी सहा वाजता आमचा रखवालदार-कम-मालक गरम गरम चहा कॉफी ठेवायचा. गुलाबी थंडीत गरम चहा आणि कॉफी प्यायला मजा यायची. 

चार चिनार हे दाल सरोवरातील एक बेट. तिथे पोहोचण्यासाठी सुमारे पाऊण तासाचा शिकारा राईड. आमचा शिकारा हाकणारा  नावाडी पूर्णतः अशिक्षित पण पक्का धंदेवाईक आणि रसिकही. त्याच्याशी बोलताना कोरोनाचा विषय निघाला. व्हॅक्सिन पेक्षा “अल्ला मेहरबान तो गधा पहलवान” या म्हणीवर त्याचा अधिक विश्वास होता आणि त्या विश्वासानेच त्या’पहेलवाना’ला करोनातून तारुन नेले होते. राजाराणी ट्रॅव्हलच्या काळात ऐकलेली आणि काश्मीर मध्ये चित्रित झालेली सगळी गाणी त्याला पाठ होती. अगदी मराठीतील “वल्हव रे नाखवा’ सुद्धा. हे चारचिनार बेट जहांगीर आणि नूरजहां यांच्या प्रेमाचे प्रतीक.

या बेटावर काश्मीर च्या स्थानिक वेशभूषेतील पोशाख चढवून  औटघटकेचे बादशहा आणि बेगम होऊन फोटो  काढता येतात. त्या बेटावर असणारा एकमेव फोटोग्राफर, ‘जहांगीर’ आणि ‘नूरजहांचे’ चार रंगाचे कपडे आणि एक कॅमेरा एवढ्या भांडवलावर,  इथे येणाऱ्या सगळ्या टुरिस्टचे फोटो  काढण्याचा धंदा करतोय.  

श्रीनगरची भेट शंकराचार्यांच्या मंदिरात  गेल्याशिवाय पूर्ण होत नाही कारण  हे मंदिर डोंगरावर आहे आणि वरून श्रीनगरचे दर्शन घेत असताना श्री अक्षरासारखी वळणारी झेलम ही दिसते व त्यामुळे ‘श्री’नगर हे नाव  का पडले हेही समजते. 


तेथे तीन फूट उंचीचे शिवलिंग आहे आणि इथून श्रीनगरचा ३६० अंशातून व्ह्यू मिळतो. वरून झेलमच्या काठावरची तीन तळी दिसतात, त्यापैकी एक दाल लेक. एक लेवल खाली उतरल्यावर शंकराचार्यांचे तपस्या स्थळ दिसते. याच शंकराचाऱ्यांच्या मंदिराच्या पायऱ्यांवर ‘जय जय शिवशंकर’ या गाण्याचे पहिले कडवे चित्रीत केले आहे. त्यामुळे येथे मुमताज आणि राजेश खन्नाच्या पोजमध्ये आपले फोटो काढण्यासाठी मंदिरापेक्षा जास्ती गर्दी असते. 
श्रीनगर मध्ये तीन मोठ्या बागा आहेत ट्युलिप, निशांत आणि मग शालिमार गार्डन. निशांत बाग जहांगीरच्या मेव्हण्याने आपल्या बहिणीसाठी बारा स्टेप्सवर (स्तरांवर) बनवलेली तर जहांगीरने बनवलेली शालीमार बाग फक्त चार स्टेप्स वर आहे. शालिमार बागेचे चित्र जुन्या दहा रुपयाच्या नोटेवर होते आणि बाग अजूनही त्या जुन्या नोटेतल्या सारखीच आणि नोटे इतकीच जुनी दिसते. 


काश्मिरची ट्युलिप गार्डन मला  अॅम्सटरडॅम मधील  ट्युलिप्स पेक्षा अधिक आवडली.  अॅम्सटरडॅम मध्ये असतं ते ट्यूलिपचे प्रदर्शन. आपल्याला प्रत्यक्ष बागांत प्रवेश नसतो. काश्मीरमधील बागेत शिरल्यावर सर्वांच्या अंगात सिलसिला मधील अमिताभ आणि रेखा संचारतात आणि सर्वजण लगेच “देखा एक बार तो ये सिलसिले हुए” या गाण्यावर आपले रिल्स बनवायला सुरुवात करतात आणि खरोखरच "हौस ती बघून डोळे किलकिले हुए." सुंदर वेगळ्या रंगांची बहरलेली ट्युलिप्स बघून त्या किलकिल्या डोळ्यांच पारणं फिटतं. त्या ट्यूलिप्सच्या मागे असते ती हिमाच्छादित डोंगरांची पार्श्वभूमी. त्यामुळे त्यांचे सौंदर्य आणखीनच खुलून येते.



श्रीनगर मधील शेवटची पहाटही नेहमीप्रमाणेच रम्य होती. घाटावर बससाठी थांबलो असताना  एका सहप्रवाशाने आपल्या मुलासाठी कोट घेतला. त्याची किंमत बघितल्यावर सगळ्यांच्या अंगात अचानक खरेदीचे वारे संचारले. दहा-बारा टोप्या, तीन-चार जॅकेट्स पाच सहा हातमोजे यांची सामूहिक खरेदी झाली. मुंबईच्या फेरीवाल्यांच्या  तुलनेत हे कपडे प्रचंड प्रमाणात स्वस्त आहेत आणि यातूनच येथील लोकांच्या गरीबीची कल्पना येते

श्रीनगर नंतरचा मुक्काम पहेलगाम. पहेलगामच्या वाटेवर केशराचे शेत लागते. त्याचा शेतकरी एक पठाण आहे त्याने त्याच्या शेताची माहिती दिली. याआधी भेटलेल्या स्थानिक लोकांच्या मानाने हा पठाण चांगला शिकला सवरलेला वाटत होता. आणि माहिती देताना त्यात इंग्रजीचाही बराच वापर करत होता. केशर फक्त काश्मीर, स्पेन आणि इराण  या तीन ठिकाणीच पिकतं आणि त्यापैकी काश्मिरी केशर कसे सगळ्यात उत्तम दर्जाचे असते आणि काश्मीरमधलं सर्वोत्कृष्ट केशर फक्त इथल्या आठ ते नऊ मैलाच्या परिसरातच फक्त आपल्या शेतात कसे पिकते याचे वर्णन त्यांनी केले. 

पुढील स्टॉप अवंतीपुरीला होता. वाटेत जुना आणि नवीन एन एच ४४  नॅशनल हायवे पाहिला. बहुतेक सगळा प्रवास या दोन मार्गांवरच झाला. जुन्या मार्गावर पुलावामाला झालेल्या बॉम्बस्फोटाचा स्पॉट पाहिला. नवीन एन एच ४४  इतका रुंद आहे की त्यावर विमानाच्या  धावपट्टी प्रमाणे विमान उतरवता येते आणि त्याचा ऐन मोक्याच्या वेळी उपयोग होऊ शकतो. वाटेत एका शिवमंदिराचे भग्नावशेष बघितले. हे मंदिर म्हणे झेलमच्या पुरात डॅमेज झाले होते. नंतर अवंतीपुरच्या विष्णू मंदिरात थांबलो. इथेही फक्त भग्नावशेष उरले होते. त्या मंदिराच्या पडझडही झेलमच्या पुरामुळेच!!! झेलमला अचानक येऊ लागलेल्या पुरांचे आणि त्याआधी  हजारो वर्ष टिकलेल्या मंदिरांच्या पडझडीचे कोडे मला सुटले नाही. इथे एका पठाण गाईडने त्याच्या पठाणी हिंदीत भिंतीवर कोरलेल्या शेषनागावर झोपलेले विष्णू, नवग्रह, चार देवी देवता यांचे वर्णन केले. त्यालाही बिचाऱ्याला हे सर्व पाठ करून रोज म्हणायला आहे किती त्रास होत असेल? या विचाराने मला गंमत वाटली. पठाणाच्या पुश्तू  उच्चारांमध्ये  आपल्या देव देवतांचे वर्णन ऐकण्यातली मजा इंग्लंडमध्ये वाढलेल्या मराठी मुलांच्या  तोंडून आपली मायबोली ऐकण्यासारखीच आहे. अवंतीपुरला मंदिरा बाहेर, राजा गोसावींना जे “चिंचेचे झाड  चिनार वृक्षापरी भासले" तो चिनार वृक्ष प्रत्यक्षात पाहिला. 


वाटेवर अनंतनाग मधून जाताना विस्थापित काश्मिरी पंडितांची  ओळीने ओसाड पडलेली तळमजल्यावरील दुकाने आणि पहिल्या मजल्यावरील घरे पाहिली.  ती पाहताना मँचेस्टर मधील दोन मित्रांनी सांगितलेल्या त्यांच्या काश्मीरमधून कराव्या लागलेल्या पलायनाच्या कहाण्या आठवल्या. यापैकी एखादे घर त्यांचे असेल का या कल्पनेने आणि त्यांची इथे काय वाताहात झाली अशा विचाराने अंगावर शहारे आले. पहेलगाममध्ये बसमधून जाता जाता 'बजरंगी भाईजान'मधील ‘पाकिस्तान’ मध्ये केलेल्या शूटिंगची जागा पाहिली.  

पहेलगाम मधील हॉटेल छोट्याशा डोंगर माथ्यावर होते. जेवण करून दुपारी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गौरीशंकर मंदिरात गेलो.  डोंगर चढून वर येताना, आधी एक, मग दोन, मग चार असे करत करत माकडांची अख्खी झुंड आमच्याबरोबर वर चढली. आमच्या सदैवाने बॅगेत काही खाण्याचे पदार्थ नव्हते, त्यामुळे आम्ही सुखरूपपणे डोंगराच्या माथ्यावर हॉटेलात पोचलो. तिथे काही जणांच्या खिडक्या उघड्या असल्याने खोलीतही माकडांनी प्रवेश केला होता.

दुसरे दिवशी टॅक्सीने चंदनवाडीला गेलो. ड्रायव्हर ज्या पद्धतीने गाडी चालवत होता त्यामुळे खरंच ‘चंदनवाडी’ ला पोहोचू की  थेट 'कैलासावर' अशी शंका आली. चंदनवाडीहून पुढे अमरनाथची यात्रा चालू होते. इथे एक दंतकथा ऐकायला मिळाली शंकराप्रमाणे पार्वतीलाही अमर व्हायचे होते. शंकर म्हणाले त्यासाठी मी तुला एक गोष्ट सांगेन, पण ती ऐकायला आजूबाजूला कोणीही असता कामा नये, कारण गोष्ट ऐकली तर ते पण अमर होतील. असं सांगून ते दोघे अमरनाथच्या दिशेने चढू लागले. वाटेत आम्ही काल पाहिलेल्या गौरीशंकर मंदिरात त्यांनी आपल्या नंदीला सोडून दिले चंदनवाडीत चंद्राला सोडले, चंदनवाडी नंतर शेषनाग नदीत सोडला आणि यानंतर गोष्ट सांगण्यापूर्वी आपला तिसरा डोळा उघडून आजूबाजूच्या झाडां सकट सगळी जीवसृष्टी नष्ट केली व गोष्ट सांगू लागले. पण त्या उष्णतेने तेथील कबुतरांची दोन अंडी उबुन कबुतरांची पिल्ले बाहेर आले आणि गोष्ट ऐकून अमर झाली. ती दोन अमर झालेली कबुतरे अजूनही तिथे आहेत असं म्हणतात. परंतु पार्वती मात्र गोष्ट ऐकता ऐकता झोपून गेली. आमची घरची ‘पार्वती’ही हीच परंपरा चालवत, माझ्या गोष्टी ऐकताना घोरायला लागते, या विचाराने मलाही “भाळी अर्धचंद्र आणि माथी शुभ्र गंगा” असल्याचा भास होऊन धन्य वाटले. अमरनाथ चंदनवाडी पासून ३२ किलोमीटरवर आहे आणि एकूण तीन दिवसाची यात्रा चंदनवाडी पासून पूर्ण करता येते.

डोंगराच्या माथ्यावर  बर्फावरून घसरू नये यासाठी आपले बूट बदलून गमबुट घालायची सोय आहे, पण सगळीकडे पठाणांचे राज्य. आमचा बूट वाला पठाण महाउर्मट होता. इतरही तसेच असावेत. तेथील प्रचंड गर्दीत ससे, मेंढा, कबुतरे इत्यादी प्राण्यांबरोबर आणि (आपापल्या) बायकोबरोबरही फोटो काढून देण्यासाठी धंदेवाल्यांची सारखी भुणभुण सहन करावी लागत होती. शेवटी एक जण फारच गळी पडल्यामुळे प्राण्यांबरोबर नाही तर निदान एकमेकांबरोबर तरी म्हणून आम्ही फोटो काढून घेतले. इथली स्लेज म्हणजे मेंढ्याने ओढायची आणि माणसाने ढकलायची घसरगाडी होती. ती जेमतेम या टोकापासून त्या टोकापर्यंत. येथील टपरीवर मिळणारे चहाचे कप हे पुण्यातील येवल्यांच्या "अमृततुल्य" चहाच्या इवल्याश्या कपाशी स्पर्धा करणारे होते. 

इथून पुढे आम्ही घाट उतरून ‘बेताब’ व्हॅलीला आलो. आख्या प्रवासात फक्त बेताब व्हॅलीलाच टॉयलेटची सोय आहे, म्हणून त्याचे "पिशाब वाडी" असेही दुसरे नामकरण मी करून टाकले. सनी देओल आणि अमृता सिंग चे शूटिंग झालेला  हा स्पॉट चारी बाजूंना पर्वतांनी घेतलेला आहे आणि मध्ये छोटीशी नदी, त्यावर ब्रिज, स्वच्छ नितळ पाणी व निरभ्र आकाश. अशी स्थळे शोधून तिथे अख्खा पिक्चर बसवणाऱ्या निर्माता दिग्दर्शकांचे मला कौतुक वाटले.


त्या रात्री बहुतेक सर्व प्रवाशांची पोटे बिघडली चांगल्या हॉटेलमध्ये राहून तेथील काश्मिरी खाण्याची प्रशंसा करत  चवी चवीने खाल्लेल्या खाण्याने पोटे कशी काय बिघडली? अशा विचाराने मी हॉटेल मॅनेजरकडे तेथील पाण्याची चौकशी केली. त्याने मोठ्या अभिमानाने मला “साब, ऐसा पानी आपको और कही नही मिलेगा. सीधा झरने से आता है” असे सांगितले. थोडक्यात म्हणजे पोटात शिरलेल्या जंतूंचे उगमस्थान थेट “श्री” झेलमच्या पाण्यात होते.

पहलगाम ते गुलमार्ग १५० किलोमीटर चा पूर्ण एक दिवसाचा प्रवास सगळ्यांनी बिघडलेल्या पोटाने घाबरत घाबरत केला. वाटेत क्रिकेट बॅट फॅक्टरीला भेट दिली. क्रिकेट पंढरीत वाढलेल्या आम्हा सगळ्यांना तिथे मिळालेली क्रिकेट बॅट बद्दलची बरीचशी माहिती नवीन होते.  क्रिकेट बॅट ही फक्त विलो ट्री पासूनच बनवता येते आणि ही झाडे फक्त इंग्लंड आणि काश्मीर मध्येच असतात, असे ज्ञान झाले. इंटरनॅशनल क्रिकेटला इंग्लिश विलो ट्री च्या आणि आयपीएलला लोकल विलो ट्री च्या बॅट वापरण्यातला भेदभावही कळला. 

गुलमर्गला मुख्य आकर्षण म्हणजे गंडोला राईड म्हणजे केबल कार वरून हिमाच्छादित शिखरे पाहण्याचा बघण्याचा प्रोग्रॅम  होता,त्यानंतर दुपारी जेवण करून ‘जय जय शिवशंकर’ गाण्याचा उत्तरार्ध ज्या मंदिरासमोर चित्रित केला आहे, ते शिवमंदिर पाहिले. हे मंदिर गोल्फ कोर्सच्या मध्यावर आहे. गोल्फ कोर्स वरून पुढे जाताना अजून एक स्पॉट आमच्या ड्रायव्हरने दाखवला त्या स्पॉटवर उजवीकडे मिशन काश्मीर मधील ‘भुमरो बुमरो’ आणि डावीकडे जब तक हे जान मधील ‘जिया जिया रे जिया रे’ गाणे चित्रीत केले होते. अगदी शम्मी कपूर पासून रितिक रोशन पर्यंत अजूनही काश्मीर आपल्या जादूने बॉलिवूडला आपल्याकडे खेचून आणत आहे.



श्रीनगरला संध्याकाळच्या मोकळ्या वेळात लाल चौकातील ऐतिहासिक घंटाघराला  भेट दिली. आमचे हॉटेल घंटाघर पासून फक्त दहा पंधरा मिनिटात मिनिटाच्या अंतरावर होते. तिथे जाण्याचा रस्ता पूर्णपणे मार्केट रोड असावा, त्यामुळे वाटेत भरपूर दुकाने आणि एक मुलांसाठी छोटीशी बाग होती. बाहेर इतर ठिकाणांप्रमाणेच पाणीपुरी, आईस्क्रीम वाले होते.. प्रत्यक्ष घंटा घराजवळ आमच्यासारख्या टुरिस्ट लोकांची फोटोसाठी गर्दी होती. का माहित नाही, पण वस्तीच्या बकालपणामुळे किंवा या ठिकाणाच्या ऐतिहासिक महत्त्व मुळे इथे दर काही मीटरवर आर्मीची तैनात होती. त्यामुळे वातावरण अगदी तंग नाही तरी मोकळे ही नव्हते.  घंटाघराला भेट देताना देशप्रेम उफाळून आल्या शिवाय राहत नाही!!


आज प्रस्थान सोनमर्गला आणि दिवस फक्त सोनमर्गसाठी. तोच रस्ता पुढे अमरनाथ यात्रेला आणि तिथून फुटलेला फाटा दुसरीकडे लेह लडाखला जातो. अमरनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टरही इथूनच सुटते. सोनमर्गला जाणाऱ्या रस्त्याला शेवटच्या ११ किलोमीटरसाठी दोन रस्ते आहेत एक टुरिस्ट साठी आणि दुसरा आर्मी साठी, कारण हे अंतर कधी कधी लँड स्लाईडमुळे कधी कधी  कापता येत नाही. सोनमर्गचे थोडक्यात वर्णन म्हणजे नितांत सुंदर हिमाच्छादित पहाड आणि त्यांचा आस्वाद घेणे मुश्किल करणारे लोकल मुकादम. आपल्याला नाना प्रलोभने दाखवून, आपला वर्षातून चार महिने चालणारा धंदा जास्तीत जास्त करायचा हे लोक प्रयत्न करत असतात. माझ्यासारख्या त्रयस्थाच्या दृष्टीने या सर्व सोयी हे हव्या पण या लोकांचा उपद्रवही नको आणि निसर्गाचे सौंदर्य ही टिकवायचे हे सगळे जमवणे जवळजवळ अशक्यप्राय वाटते. 

इथे अनेक स्नो ऍक्टिव्हिटी आहेत, त्यापैकी आम्हाला जमण्याजोग्या दोन - स्लेजिंग म्हणजे एक माणूस आपल्याला ओढतो आणि दुसरी स्नो मोटर, जी डिस्नीच्या कुठल्याही राईड पेक्षा खतरनाक होती. आम्ही सांगितलेल्या “हळू चालव” चे भाषांतर “और जोर से” असे करत हे लोक स्नोबाईक अतिशय भन्नाट चालवतात. थोडं वर घेऊन गेल्यावर तुम्हाला तिथे फिरण्यासाठी मोकळा वेळ देऊन सोडतात. आमच्या ग्रुपमधील कोणालाच बर्फामध्ये फारसे स्वारस्य नसल्याने आम्ही लगेचच परतणार होतो, पण पहिले तीन जण परतल्यावर चेंगराचेंगरी सुरू झाले काहीजण घसरून पडले. अखेर बाईक वळवायला जागा न उरल्याने एक बाईक आणि त्यावरील ड्रायव्हर आणि वयस्कर गृहस्थ बाईकवरून खाली उलटे पडले म्हणजे खाली डोकं वर पाय. सुदैवाने कोणाला इजा झाली नाही. ‘सुरक्षितता’ विरुद्ध ‘जगण्याची धडपड’ अशी इथे  परिस्थिती आहे. "अकाउंटेबिलिटी" किंवा "रेगुलेशन" हे शब्द कोणाला माहीतच नसावेत. 

यावरून आठवलं की प्रवास वर्णन लिहायला काश्मीरमध्ये सहजपणे कुठे कागदच मिळत नव्हता काश्मीरमध्ये कागद आणि पेन्सिल शोधणं बंदूक मिळवण्यापेक्षा अधिक  कठीण असाव. आपल्याकडे अगदी किराणा दुकानातही एखादा फटका कोरा कागद सहजपणे मिळतो. इथे पहिली काही पाने बिलांच्या मागे लिहावी लागली. एकंदरीत शिक्षणाची वानवा असावी. पहिल्या दिवशीच्या शिकारावाला ‘मी अजिबात शिकलो नाही’ हे न लाजता सांगत होता पण तरी स्वतःच्या हिमतीवर चार पैसे कमवून संसारही चालवत होता. माझे शिक्षण आणि यश याबद्दलचे विचार पुन्हा डोके वर काढू लागले. माणसाला शिक्षण खरोखरच लागते काय पण हा विचार नंतर आमच्या टॅक्सी ड्रायव्हरने साफ धुवून काढला. माझे सहप्रवासी सीट बेल्ट लावायचा प्रयत्न करत होते आणि हा पठ्ठ्या त्यांना सांगतोय की इथे पोलीस सीटबेट लावला नाही तरी काही करत नाहीत आणि आपल्या जाण्याच्या वाटेत पोलीसच नाहीत. अशा वेगवेगळ्या सबबी खाली सेट बेल्ट लावला नाही तरी चालेल हे त्यांना पटवून देत होता. त्याला आम्ही समजावून द्यायचा प्रयत्न केला आहे की हे सीट बेल्ट्स आपल्या सुरक्षेसाठी असतात विशेषतः तू ज्या पद्धतीने ड्रायव्हिंग करत आहेस त्यामुळे. पण पालथ्या घड्यावर पाणी. 

अख्ख्या सहलीमध्ये आम्ही भरभरून निसर्ग पहिला, हिमालय पाहिला, दहशतवाद्यांच्या हल्ल्याची ठिकाणं पाहिली, भारतीय सेनेची आदरस्थाने पाहिली, आत्तापर्यंत फक्त बॉलीवूड मध्ये  पाहिलेले काश्मीर पाहिले, पण तिथे फिरताना हिमालयाच्या उत्तुंग पार्श्वभूमीवर सतत जाणवत राहिला तो वातावरणातील तणाव आणि नंदनवनातील सर्वसामान्य लोकांच्या नशिबी आलेली निरक्षरता आणि  गरिबी!

- रवी दाते, मँचेस्टर, यु. के. 

No comments:

Post a Comment

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर