काला पानी, निळे पाणी
रवी दाते
काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत भारत एक आहे असं अभिमानाने म्हणणाऱ्या माझ्यासारख्या भारतीयाच्या या समजूतीला पहिला तडा अंदमान निकोबार द्वीप समूहाला भेट देण्याचे ठरवल्यावर त्या बेटांबद्दल वाचायला सुरुवात केली तेव्हा गेला. त्या वाचनात ग्रेट निकोबार आयलँड हा भारताचा सर्वात दक्षिणेकडचा बिंदू आहे असा शोध लागला. त्यामुळे आपण केवळ ‘का’ला ‘क’ जोडला नाही तर कानाला कसंतरीच वाटतं म्हणून “काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भारत एक आहे” असं चक्क चुकीचं वाक्य इतके दिवस म्हणत आलोय अशी माझी खात्री पटली!
यापुढील वाचनात माझे अज्ञान अधिकाधिक प्रकट होत गेले. अंदमान आणि निकोबार ही फक्त दोन बेटे नसून, तब्बल ८३६ बेटांचा द्वीपसमूह आहे आणि यापैकी पर्यटकांना आकर्षित करणारा आणि उपलब्ध असलेला भाग म्हणजे फक्त अंदमान. निकोबार हा नौदलाचा तळ असल्यामुळे पर्यटनासाठी तेथे परवानगी नाही.
या ८३६ बेटांपैकी फक्त ३१ बेटांवर लोकवस्ती आहे आणि यापैकी पर्यटकांना आकर्षित करणारी बेटे फक्त हाताच्या बोटावर मोजता येण्याजोगी, उदा विजयापुरम् उर्फ पोर्ट ब्लेअर, स्वराज्य दीप उर्फ Havelock, शहीद द्वीप उर्फ Neil island आणि Ross island. निर्जन बेटांपैकी पर्यटकांना परवानगी फक्त जॉली बॉय आणि रेड स्किन वर. यापैकी नेताजी सुभाषचंद्र यांच्या रॉस आयलँड वरील दीपस्तंभाला जुन्या २० रुपयाच्या नोटेवर ही स्थान आहे.
इथे येणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी मुख्य ‘आकर्षण’ म्हणजे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या छळासाठी खास तयार केलेला सेल्युलर जेल आणि परदेशी लोकांसाठी मुख्य आकर्षण ते येथील निळ्या समुद्राचे.
निळ्या रंगाच्या विविध छटांनी वेढलेल्या अंदमान द्वीप समूहाला लाभलेले एकमेव विजोड पर्यटन स्थळ म्हणजे सेल्युलर उर्फ ‘कालापानी’ जेल. इथे मिळणाऱ्या यापेक्षा यातनांपेक्षा मृत्यू (काल) परवडला म्हणून त्याचे नाव काला पानी, त्याच्या रंगामुळे नव्हे.
गीतेमध्ये अर्जुन श्रीकृष्णाला स्थितप्रज्ञ मनुष्य कसा ओळखावा असा प्रश्न विचारतो. जर भगवद्गीता कुरुक्षेत्राऐवजी १९२२ नंतर सांगायची वेळ आली असती तर श्रीकृष्णाने सुखदुःखे समे कृत्वा सारखी लांबलचक उत्तरे न देता सावरकरांसारखा मनुष्य असे सुटसुटीत उत्तर दिले असते. इथे होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळानंतर आणि आपल्याला इथे केवळ छळून मारण्यासाठीच आणलेले आहे हे माहीत असताना या “टिचभर अंगकाठीच्या इसमाने” तापाने फणफत असताना कोलूचा घाणा चालवता चालवता भिंतीवर महाकाव्यं लिहिली, एकीकडे ब्रिटिशांविरुद्धचा लढा चालू ठेवला, त्याचबरोबर तुरुंगातील हिंदूंच्या धर्मांतराविरुद्ध लढाही दिला. असले अनेक ‘उपद्व्याप’ करण्यासाठी लागणाऱ्या साम्य किंवा स्थिर बुद्धीच्या स्थितप्रज्ञाचे सावरकरांशिवाय जगात दुसरे उदाहरण शोधणे श्रीकृष्णालाही कठीणच गेले असते.
तर असा हा सेल्युलर जेल पोर्ट ब्लेअर या बेटावर वसलेला आहे. त्याच्या सेंटर टॉवर वरून त्याच्या सातही शाखांवर नजर ठेवता येते. पैकी आता फक्त १,७,६ या तीन शाखा शाबूत आहेत उरलेल्या चार शाखांच्या जागेत गोविंद वल्लभ पंत रुग्णालय बांधले आहे. कैद्यांना सूर्यप्रकाश न मिळण्याची आणि एकमेकांशी संपर्क साधू न देण्याची सगळी सोय इथे आहे. फाशीच्या कैद्यांसाठी वेगळी अंघोळीची, तीन जणांना एकदम फाशी देण्याची आणि हे दृश्य सगळ्या कैद्यांना पाहता येईल आणि घंटेद्वारे त्याचा सर्वत्र बोभाटाही होईल अशा विविध सोयी मायबाप सरकारने इथे स्वतःच्या करमणुकीसाठी केल्या आहेत…होत्या.
रात्री होणाऱ्या लाईट अँड साऊंड शो मध्ये त्यांचा थरारक अनुभव मिळतो व आपल्याला फुकट मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत किती लोकांनी आपले तारुण्य, आयुष्य, महत्वाकांक्षा आणि संसार याची आहुती देऊन मिळवले आहे याची कल्पना येते; आपल्या स्वार्थीपणाची अधिकच लाज वाटू लागते. आश्चर्याची आणि खेदाची गोष्ट म्हणजे इथे भेटलेल्या काही तरुण भारतीय जोडप्यांना निळ्या पाण्यातील सर्व ऍक्टिव्हिटी ची पूर्ण माहिती होती, पण या तुरुंगाबद्दल त्यांनी कधी ऐकलेही नव्हते. त्यामुळे तेथील छळ, स्वातंत्र्य, सावरकर याबद्दल अधिक माहितीची त्यांच्याकडून अपेक्षा करणे व्यर्थ होते.
आमच्या पर्यटनाच्या पहिल्या दिवशी तुरुंग पाहिल्यावर आम्ही बोटीने स्वराजदीपावर गेलो. या दोन बेटातील अंतर नकाशात जाणवणाऱ्या अंतरापेक्षा खूपच अधिक आहे एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जाण्यासाठी सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही बोट सेवा उपलब्ध आहेत. आम्ही नॉटीका आणि मॅकृस या दोन्ही खाजगी सेवा वापरल्या. दोनही बोटीचे प्रवास फारच सुखकारक होते. परंतु बोटीवर चढणे आणि उतरणे हा एक स्वतंत्र अनुभव होता. एका बेटावरून दुसऱ्यावर जाण्यासाठी विमानातून आणलेले सगळे सामान न्यावे लागते फक्त एक-दोन दिवसासाठी ची ओव्हरनाईट बॅग नेण्याचा पर्याय नसतो. त्या बॅग्स बोटीवर चढवण्यासाठी ‘साथी हाथ बढाना’ या गाण्याततील कामगार ज्याप्रमाणे विटा एकमेकांकडे फेकून पुढे पुढे नेतात, अगदी तश्शीच व्यवस्था आहे. दहा पंधरा किलो वजनाच्या बॅग्स तीन ते चार माणसे एकमेकांकडे फेकून एकावर एक बोटीत रचतात. त्यापैकी मधला माणूस एक पाय बोटीवर आणि दुसरा किनाऱ्यावर ठेवून उभा असतो. त्या माणसाप्रमाणेच आपला जीवही आपली बॅग ढिगार्यात जाऊन पडेपर्यंत दोलायमान स्थितीत असतो. बॅग्ज बाहेरही याच पद्धतीने येतात व त्यातून आपली बॅग शोधून काढण्यासाठी सर्वजण बाजी प्रभूंच्या आवेशात पुढे पुढे सरकत असतात. या गोंधळापासून अलिप्त अशा ललना किनाऱ्यावर ओठाचे चंबू करून जलपरीच्या पोज मध्ये सेल्फी घेण्यात मग्न असतात. ज्यांना सेल्फी पेक्षा आपल्या नवरे मंडळींनी घेतलेले फोटो अधिक आवडतात त्यांचे नवरे बॅग का चंबूचा फोटो? या संभ्रमात उभे असतात. त्यांची ही दुविधा सोडवण्यासाठी एक सागरी तटरक्षक फोटोसाठी बंदी करत उभा असतो. ती बंदी त्याची पाठ वळेपर्यंतच टिकते कारण राष्ट्रीय सुरक्षेपेक्षा चंबूचे छायाचित्र अधिक महत्त्वाचे असते.
या समारंभा पूर्वी नाॅटिका, मकरूस आणि सरकारी अशा तिन्ही बोटींचे प्रवासी एकत्र रस्त्यावर उभे असतात. कोणाची बोट आधी सुटणार याची अनाउन्समेंट खाजगी कुजबूज केल्या इतपतच मोठ्या आवाजात होते. त्यामुळे एकच हलकल्लोळ होतो. तो होत असतानाच असंख्य बेवारशी कुत्री खाण्याच्या आशेने प्रवाशांच्या घोळक्यातून फिरत असतात. मुंबईतील कुत्र्यांप्रमाणे अंदमानातील कुत्रे आक्रमक नसतात. खर तर अगदी लाचार आणि दिनवाणे दिसतात. त्यातील बरेचसे कुत्रे रोगट़, जखमी आणि बरगड्या वर आलेले असतात. धर्मेंद्र सिंग देवलांनी जाण्यापूर्वी त्यांना पाहिले असते तर पुन्हा ‘कुत्ते मै तेरा खून पी जाऊंगा’ हा डायलॉग म्हणण्याची त्यांना हिंमतच झाली नसती.
त्या प्रवासातून सुखरूप पार पडल्यावर मिळणारे नंतरचे नेत्र सुख या कटू अनुभवाला क्षणात विसरायला लावते. अंदमानचे पाणी केवळ निळेच नाही तर त्यावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे ते एकाच वेळी निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटाही दाखवते. यात नेव्ही, फिरोजा, इंडिगो, आकाशी, मोरपिशी, आर्क्टिक इत्यादी पुरुषांना अज्ञात अश्या सर्व निळ्या रंगछटांचा समावेश होतो. पण या सर्वांपेक्षा अद्भुत असा turquoise ब्ल्यू समुद्र स्वराज द्वीपावरील काला पत्थर बीचवर पाहायला मिळतो.
यापैकी एका निळ्या रंगाच्या संथ समुद्रात डुंबत आम्ही राधानगरीचा सूर्यास्त मनसोक्त अनुभवला दुसऱ्या दिवशी हॉटेलपासून एलिफंटा बीचवर जाण्यासाठी राधानगर प्रमाणेच टॅक्सीने जाऊ असे वाटले होते परंतु तेथे फक्त छोट्या बोटीने जाता येते. जमिनीवरून इथे पोहोचण्यासाठी बरेच अंतर ट्रेकिंग करत यावे लागते त्यामुळे बोट हा एकमेव पोहोचण्याचा मार्ग.हा बीच संपूर्णतः कमर्शियल ऍक्टिव्हिटीज साठी आहे व फक्त दुपारी तीन पर्यंत उघडा असतो. तीन वाजता दुकाना सकट सगळेजण आपापल्या घरी परततात. इथे स्नोरकेलिंग स्कुबा डायविंग पॅरासेलिंग मोटर बोट इत्यादी सर्व प्रकार करता येतात. आमच्या ग्रुप मधील सर्वात तरुण सदस्य साठ वर्षाचा असल्याने नोंदवहीत सर्वांनी आपापले वय ५९ लिहून ऍक्टिव्हिटीज केल्या. मला आयुष्यात प्रथमच वय लपवल्याचा ‘आनंद’ मिळाला. या प्रवासासाठी लागणाऱ्या छोट्या बोटी किनाऱ्यापर्यंत आणता येत नाहीत, त्यामुळे गुडघाभर पाण्यातून बोटीपर्यंत चालावे लागते. बोटीत चढल्यावर उरलेले शरीर ओल्या बाकड्यांमुळे आणि बोट वाकडी झाल्यावर उडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यामुळे भिजते. त्यामुळे काहीही ऍक्टिव्हिटी केली नाही तरी तुम्ही केवळ बोटं प्रवासाने पूर्णपणे भिजता, या पद्धतीने भिजला नाहीत तर स्वतःच्या घामाने भिजता. यानंतर कपडे आणि शरीर दोन्ही वाळत नाहीत, ते फक्त कमी ओले होतात कारण हवेत आर्द्रता ७० ते ८० टक्के आहे. या आर्द्रतेमुळे कधी कधी मोबाईलच्या स्क्रीनवरून (हाताचे) बोट न सरकता एकाच जागी चिकटून बसते.
अंदमानची कोरल्स कदाचित ग्रेट बॅरियर रीफ इतकी देखणी नसतील पण ती मनसोक्तपणे अनुभवता येतात. आम्ही स्नोरकलिंग करत तसेच ग्लास बॉटम बोटीतून खूप कोरल्स आणि मासे बघितले. बरेचसे कोरल्स चे आकार आणि माशांचे प्रकार लक्षात ठेवता आले आणि शेवटी शेवटी तर ओळखताही येऊ लागले. या दृष्टीने इथले कोरल दर्शन नक्कीच सरस वाटले. ग्लासबोटीतून कोरल्स बघायची सोय जॉली बॉय आणि रेड स्किन आयलँड वर आलटून पालटून सहा सहा महिने असते उरलेले सहा महिने कोरल्सना माणसांपासून विश्रांती देऊन त्यांच्या वाढीसाठी जपून ठेवलेले असतात. या दोन्ही बेटांवर मनुष्य वस्ती नाही त्यामुळे ‘कहो ना प्यार है’ मधल्यासारखी स्थिती सहा महिने असते. इथल्या भेळेची आणि फळांच्या चाटची शिफारस केल्यामुळे तिथल्या “चौपाटी”वर भेळ व चाट खाल्ला पण मुंबईतल्या भेळेची सर (का घामाची चव) त्याला नव्हती. तेथील गूळ खोबऱ्याचा लाडू आपल्या मोदकातील सारणासारखा आणि खोबऱ्याचा लाडू आपल्याकडील खोबर्याच्या वडी सारखा लागतो. नील आणि हॅव लॉक वर असलेली अजून एक वैशिष्ट्यपूर्ण ऍक्टिव्हिटी म्हणजे स्टार गेजिंग. यासाठी ते तुम्हाला हॉटेलवरून कारने नेतात आणि परत पोचवतात. बहुतेक सगळे ग्रह, मुख्यतः गुरू आणि शनी आपल्या कड्यासकट दिसतात असे सहप्रवाशांनी सांगितले. आम्ही कपडे सुकवण्यात व्यग्र असल्याने आणि आकाश ढगाळ असल्याने स्टार गेझिंगना चाट दिली. नील आयलंडवर ओहोटीच्या वेळी डेड कोरल करून चालत रॉक फॉर्मेशन ने तयार झालेला नैसर्गिक पूल पहायला जाता येते. या कोरल्स करून चालताना छोट्या छोट्या खळग्यात भरतीच्या वेळी आलेले आणि अडकून पडलेले छोटे मासे आणि खेकडे असे बरेच प्राणी दिसतात.
अंदमानात सूर्योदय आणि सूर्यास्त लवकर होत असल्याने सहानंतर सगळी बेटे शांत होतात.
अशा निसर्ग दर्शनाचा आणि तुरुंगाचा मिश्र अनुभव घेऊन चिंब भिजलेले आम्ही त्या सर्व अनामिक स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करत पण वेगळ्या अर्थाने (सुखरूपपणे आणि वेळेवर) ‘ने मजसी ने’ म्हणत इंडिगोत चढलो.
- रवी दाते, मॅंचेस्टर, यु. के.
No comments:
Post a Comment
प्रतिसाद