प्रवासी बूट - जावे त्यांच्या वंशा
विशाखा जावडेकर
छोटी सहल असो वा लांबचा प्रवास- आधी विचार येतो तो फूटवेअरचा. आपला प्रवास सुखाचा होण्यात सगळ्यात मोठा वाटा असतो या बुटांचा. चावणारं, जाच देणारं पादत्राण प्रवास नकोसा करतं आणि असा कष्टमय प्रवास करणाऱ्याची व्यथा कळायला..'Walking in someone’s shoes' हा इंग्रजीने बहाल केलेला अगदी चपखल वाक्प्रचार.
हल्लीच ज्ञानाचा खजिना यू ट्यूब वर प्रवास करताना ह्याचा साक्षात्कार झाला.
आचार्य अत्रे .. लहानपणी त्यांच्या बद्दल “अगदी नेहरूंवरही कडक टीका करण्याचं सामर्थ्य असलेले”, झुंजार लेखक, पत्रकार आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रेसर नाव इतकीच काय ती ओळख.
इंग्रजीतून शिक्षण घेतल्यामुळे मराठी वाचन किरकोळ आहे माझं… अत्र्यांच साहित्य न वाचणं हे त्यातलं एक दुर्दैव.
पण यूट्यूब ने आज ती उणीव भरून काढण्याचा राजमार्ग आता खुला करून दिला आहे!
असंच काही दिवसांपूर्वी अत्र्यांचे लेख / भाषणं माझ्या फीडमध्ये आले आणि मला जॅकपॉट लागल्यासारखं मी ते ऐकत सुटले… लेखणी आणि वाणी किती शक्तिमान असू शकते याचा उत्तरोत्तर प्रत्यय येऊ लागला.
तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर.. लहानपणी पोपटपंची करत “Father of Indian Constitution “ आणि नंतर समज आल्यावर “यांच्या” मुळे “त्यांना” लायकी नसतानाही आम्हाला लायकी असून जे मिळत नाही ते मिळते इतकंच काय ते ज्ञान (!)
एक दिवस अचानक (अल्गोरिथमची किमया) अत्र्यांनी त्यांच्या मराठा वृत्तपत्रात २२/११/१९५६ रोजी लिहिलेला अग्रलेख श्राव्य स्वरूपात समोर आला. शीर्षक “आम्ही महार असतो तर ? “
आणि काय सांगू मित्रांनो… अचानक चालता चालता बुटात कोणीतरी पाय आवळतंय असा भास झाला…
ज्ञानाचा, माहितीचा प्रवास चिरायू होवो !
- विशाखा जावडेकर, स्टॅफोर्ड,
यु. के.
वर उल्लेखलेल्या आचार्य अत्र्यांच्या अग्रलेखाचा दुवा:
No comments:
Post a Comment
प्रतिसाद