सुंदर ते स्कॉटलंड
पुष्कर उज्जैनकर (धक्का मार पुष्कर!)
बरोब्बर सकाळी ७ वाजता गणरायाच्या नावासोबत आमचा सगळ्यांचा म्हणजे मी, स्नेहल, आई आणि बाबा ह्यांचा प्रवास विल्मस्लोपासून ते स्कॉटलंडच्या दिशेने. आई बाबा तर उत्सुक होतेच पण त्यासोबत आम्ही देखील होतो. कारण आमचा पण हा पहिलाच प्रवास स्कॉटलंडला. त्यात आम्ही नवीन गाडी देखील घेतली होती. होती सेकंड हँड पण आमच्यासाठी नवीनच.
"पृथ्वीवर स्वर्गासारखी
जागा कुठे आहे?" असा प्रश्न जर कुणी विचारला, तर डोळ्यांसमोर उभी राहते ती स्कॉटलंडचे
निळेभोर तलाव (Lochs), ढगांशी संवाद साधणारे डोंगर (म्हणजे अक्षरशः डोंगरांवर ढग लोळत
पडले आहेत असं वाटत होतं) आणि सुंदर रस्ते. २०२४ साली मी माझ्या कुटुंबासोबत स्कॉटलंडचा
एक पाच दिवसांचा प्रवास केला, जो माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभवांपैकी एक ठरला.
कारने प्रवास करताना वाटेत बदलणारे निसर्गाचे रंग मनाला मोहून टाकत होते. स्कॉटलंडच्या सीमेत शिरताच वातावरणात एक वेगळाच गारवा आणि ताजेपणा जाणवला.
स्कॉटलंडमधील पहिल्याच दिवशी आम्ही लेक लोमंड (Loch Lomond) ला भेट दिली. हा युकेमधील सर्वात मोठा तलाव आहे. या तलावाच्या काठाने ड्राइव्ह करताना उजव्या हाताला दिसणारे निळे पाणी आणि सभोवतालचा डोंगर बघून आपण एखाद्या हॉलिवूडपटात आहोत की काय, असा भास होतो.
आम्ही ज्या दिवशी प्रवास सुरू केला त्या दिवशी बाबांचा वाढदिवस होता (१६ सप्टेंबर). त्यांना माहित नव्हतं आम्ही आधीच गुपचुप केक घेऊन ठेवला होता. Loch Lomond ला पोहोचल्यावर छान एक बाक बघून तिथे आम्ही सगळे बसलो आणि हळूच केक बाबांपुढे सरकवला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. Loch Lomond च्या बाजूला आणि निसर्गाच्या कुशीत आम्ही केक कापत होतो. बाबा खुश तर आई जास्त खुश झाली होती त्याचं कारण म्हणजे आम्ही जेव्हा Loch Lomond ला पोहोचलो तेव्हा तिथे एक लग्न सुरू होतं आणि त्यांनी खास bagpiper चा बँड बोलावला होता. स्कॉटलंडची जी खासियत आहे की किल्ट घालून चालणारे bagpipers आणि त्यांचं सुरेल संगीत तुमच्या अवतीभवती, अगदी तेच आम्हाला अनुभवायला मिळत होतं. त्यामुळे आमचा वाढदिवस साजरा करणं तर छानच सुरू होतं.
त्यानंतर आम्ही ग्लेन को (Glen Coe) माउंटेन्सच्या दिशेने निघालो. इथला रस्ता छोटा असला तरी निसर्ग मात्र अथांग होता. जिकडे बघावं तिकडे त्याच्या पर्वतरांगा आणि त्यातून चालणारी आमची छोटीशी कार. शब्दात मांडणं पण कठीण आहे इतका छान प्रवास आमचा सुरू होता आणि त्यात आई बाबांना आवडतील म्हणून मध्ये मध्ये किशोर कुमार, रफी अशी गाणी देखील सुरू होती.
आमचा मुक्काम त्या रात्री फोर्ट विल्यम (Fort William) मधील एका 'स्टॅटिक कॅराव्हॅन' (Static Caravan) मध्ये होता. तसं आम्ही फोर्ट विलियम ला पोहोचलो. आमच्यासाठी पण नवीनच होतं. आम्हीदेखील पहिल्यांदा त्याच्यात राहणार होतो. घरासारख्या सर्व सोयी असलेल्या या फिरत्या घरासमोरून दिसणारा सूर्यास्त डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. आम्ही जवळ जवळ तासभर सूर्यास्त, आकाशाचे रंग आणि समोर असणारा अथांग तलाव बघत होतो. अगदी तलावासमोर म्हणजे Loch Linhe समोर ती स्टॅटिक कॅराव्हॅन म्हणजे आमचं तीन दिवसांचं घर होतं. त्यात आम्ही राहणार होतो. आणि गेल्या गेल्या आम्हाला जे दृश्य दिसलं ते बघूनच आम्ही सगळे म्हणालो उत्तम निर्णय. गाडीच्या डीक्कित आम्ही आवर्जून काही गोष्टी घेतल्या होत्या त्यात कुकर, डाळ, तांदूळ, पोहे आणि मसाले. जेणेकरून आई बाबांची जेवणाची सगळी सोय होईल.
फोर्ट विल्यम हे पर्यटकांसाठी एक केंद्रस्थान आहे. असं आमच्या मित्रांनी सांगितलेलं आणि अगदी तसंच होतं. दुसऱ्या दिवशी तिथून आम्ही विविध ठिकाणी भटकंती केली. इंग्लंड सारखेच स्कॉटलंडमधील लोक देखील आरोग्याप्रति खूप जागरूक आहेत; तिथे अनेक लोक ट्रेकिंग, सायकलिंग, बोटिंगचा आनंद घेताना दिसत होते. सुरुवातीला ते बघून आम्हाला लाज वाटत होती की आपण काहीच करत नाही पण नंतर सारखं सारखं बघून ती लाज देखील गेली की लोक हेच करतात इकडे. त्यामुळे ठीक आहे. वाटेत अनेक ठिकाणी बेरीजची (Berries) झाडं आणि डोंगरातून वाहणारे स्वच्छ पाण्याचे झरे मन प्रसन्न करत होते. बाबा जास्त व्यक्त होत नाही आईसारखे पण त्यांच्याकडे बघून कळत होतं की खुश आहेत ते.
दुसऱ्या दिवशी आम्ही Cairngorm Mountain, रेनडीअर सेंटर आणि Loch Morlich फिरलो. Cairngorm Mountain ला आम्ही सकाळी सकाळी गेलो पण इंग्लंड सारखंच स्कॉटलंडचं वेदरदेखील अनप्रेडिक्टेबल. आम्ही वर गेलो म्हणजे बेस स्टेशन (६३५ मीटर ) च्या इथे पोहोचलो आणि गाडी पार्क केली. गाडीच्या बाहेर पडलो आणि जोरदार हवा तिकडे. आम्ही ढकलले जाऊ लागलो इतकी हवा. तापमान अगदी १-३ असेल. आई बाबा पूर्ण पॅक झाले. आम्हीपण पूर्ण पॅक झालो. कारण गार हवा गाडीच्या किल्लिवरचं lock button पण दाबू देत नव्हती इतक्या जोरात सुरू होती. कसं बसं आम्ही तिथल्या प्रसिद्ध आणि स्कॉटलंडमधील एकमेव ट्रेन जवळ पोहोचलो ती म्हणजे Funicular train. जी तुम्हाला बेस स्टेशनपासून म्हणजे ६३५ मीटर पासून टॉप स्टेशन (१०९७ मीटर) ला दहा मिनिटांमध्ये घेऊन जाते. पण दुर्दैवाने ती बंद होती. दुर्दैवाने की सुदैवाने असा आम्ही विचार केला कारण खाली जर इतकी हवा होती तर वर पूर्ण वाट लागली असती हे आम्हाला खालीच लक्षात आलं होतं. मग आम्ही तिथे कॅन्टीनला जाऊन गरम सूप आणि ब्रेड खाऊन आलो. तिथे फायर प्लेसला छान आग सुरू होती. उबदार होतं ते कॅन्टीन छान. त्यामुळे तिथे थांबलो आणि आम्ही निघालो रेनडीअर सेंटरच्या दिशेने. स्कॉटलंड मधला प्रवास हा अंतराने कायम मोठा असतो. प्रवास वर्णनात वाचताना छोटा वाटतो पण बराच मोठा असतो. म्हणजे रोजचे ३०० ते ३५० किलोमीटर चा प्रवास आमचा होत होता. आम्ही रेनडीअर सेंटरला भेट दिली की रेनडीअरने आम्हाला भेट दिली ते काही कळलं नाही. कारण मी जिथे उभो होतो तिथेच सगळे रेनडीअर समोर येऊन उभे राहिले. आणि घे एकदाचे फोटो असं म्हणत असावेत किंवा आपल्यातलाच एक दिसतोय असं म्हणत असावेत! असो पण भेट छान झाली. संध्याकाळी छान loch Morlich ला बसून कॉफी घेतली. (कॉफीच घेतली बरका!!) आणि तिथून परत फोर्ट विलियमला येऊन आम्ही मुक्काम केला. एकंदरीत त्या दिवशी लक्षात आलं की वातावरण काही छान मिळणार नाहीये आपल्याला आणि तशी आम्ही सगळ्यांनीच मनाची तयारी केली होती.
तिसऱ्या दिवशी आम्ही निघालो ते Isle Of Skye ह्या बेटाच्या दिशेने. जो स्कॉटलंडचाच भाग आहे. जाताना आम्ही गाडीने गेलो आणि येताना फेरीने परत आलो. Isle of Skye ला जाताना Eilean Donan castle बघायला थांबलो. पण तो किल्ला बघायला जात असताना रस्त्यात लघु शंका आणि नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलो. तशी एकांत जागा होती. आजुबाजूला काहीच घरं नाही की दुसरे हॉटेल नाही. एक पेट्रोल पंप आणि हॉटेल बास. आजूबाजूला सगळ्या पर्वतरांगा. आम्ही रिस्कघेऊन तिथे थांबलो. पण थांबण्याचा निर्णय अतिशय योग्य होता हे आम्हाला आत जाऊन कळलं. कारण नाश्त्याला भारतीय समोसे आणि मसाला चहा होता. आणि नुसतेच नव्हते तर चवीला पण तितकेच भारतीय होते म्हणजे छान होते. आम्ही सगळे प्रचंड खुश झालो होतो की स्वर्गात अजून छोटा स्वर्ग सापडला. पोटभर खाऊन, आनंद व्यक्त करत आम्ही तिथून Eilean Donnan castle बघायला पोहोचलो. पण तिकीट ऐकून बाबा तडक म्हणाले की बाहेरूनच बघू इतकं काही नाही. आईची पण संमती त्याला होती. तिथे आम्ही काही फोटो काढले. त्या कॅसलचं एक वैशिष्ट्य आम्हाला माहिती आहे म्हणजे 'कुछ कुछ होता है ' ह्या गाण्याचं शूटिंग इथे झालं आहे म्हणून तिथे शाहरुख पोजमध्ये काही फोटोज् काढले आणि निघालो Isle of Skye च्या दिशेने. जाताना Skye Bridge वरून मुद्दाम ह्या बेटावरून त्या बेटावर आम्हाला जायचं होतं म्हणून तो रस्ता आम्ही निवडला. त्या पुलावरून जाताना खरच असं वाटतं की तुम्ही आकाशात जाताय पण ते काही सेकंदच वाटतं आणि परत तुम्ही जमिनीवर येता. आणि तिथून Portree ला गेलो जी Isle of Skye ची राजधानी आहे. खरं सांगायचं तर तो अनुभव काही इतका खास नव्हता पण तरी तिथे थोडावेळ घालवला आणि तिथून आम्ही Harry Potter च्या Hogwarts Express ला बघण्यासाठी निघालो आणि ते म्हणजे Glenfinnan Viaduct ला. त्यासाठी आम्ही Portree वरून ferry boat केली आणि तिथून परत स्कॉटलंड ला म्हणजे Mallaig उतरून आम्ही ती express बघायला गेलो. त्या फेरी बोटीचं ऑनलाइन बुकिंग होत नव्हतं पण सुदैवाने आम्हाला त्यात ऑन द स्पॉट जाऊन जागा मिळाली. त्या एक्सप्रेस ची वेळ बघून आमचा सगळा प्लॅन सुरू होता. तसं आम्ही तिथे पोहोचलो. पण तिथे पोहोचल्यावर लक्षात आलं की आई बाबांसाठी ते चालणं आणि चढणं खूप कठीण होतं म्हणून आम्ही त्यांना खाली थांबवून दोघे वर चढत गेलो. ट्रेन आम्हाला दिसली पण उलट्या बाजूने दिसली. आमचं नशीब खराब होतं कारण वर चढेपर्यंत काहीच पाऊस नव्हता पण वर पोहचलो आणि ट्रेन यायच्या बरोब्बर ३० सेकंद आधी धो धो पाऊस पडायला लागला. पण ट्रेन दिसली त्यात आनंद आम्ही मानला. हा सगळा दौरा मी माझ्या YouTube चॅनलवर टाकला आहे. पण ट्रेन गेल्यावर आम्हाला त्या सुंदर पुलाच्या अवतीभवती २ मोठ्ठे इंद्रधनुष्य दिसले. मी कधीच इतके मोठे इंद्रधनुष्य पाहिले नव्हते ते पण एकदम २ आणि तेही खूप प्रखर. म्हटलं चला इतक्या वर येऊन काही तर सार्थकी लागलं. हे सगळं करून आम्ही परत फोर्ट विल्यमला मुक्कामाला गेलो.
चौथ्या दिवशी आम्ही सकाळी लवकर उठून तळ्याजवळ थोडं फिरून घेतलं, कारण आमचा तो मुक्काम शेवटचा होता त्या स्टॅटिक कॅराव्हॅनमधला आणि तो निसर्ग परत अनुभवायला परत मिळणार नव्हता. पण मनात सगळं साठवून आम्ही निघालो Ben Nevis च्या दिशेने जायला. Ben Nevis तसं मुक्कामाच्या ठिकाणापासून जवळ होतं. आम्ही घरीच नाश्ता केला आणि तिकडे जायला निघालो. Ben Nevis चे वैशिष्ट्य म्हणजे तिथे Gondola आहे वर जाण्यासाठी म्हणजे केबल कार किंवा रोपवे आहे. त्याने आम्ही वर जाणार होतो. तर Cairngorm Mountain ला आमची जी हालत झाली होती तीच हालत आमची इथे पण झाली. जोरदार हवा, प्रचंड थंडी आणि त्यात पाऊस पण होता. आम्ही दोन दोन तीन तीन कपड्यांचे लेयर घातले आणि वर जाण्यासाठी निघालो. पण तरी थंडी वाजत होती. तिकीटे काढण्यासाठी आम्ही तिथे काउंटर वर गेलो आणि तिथल्या बाईने आम्हाला वॉर्निंग दिली की सीनियर सिटिजनला वर नेऊ नका कारण इथे १-२ तापमान आहे तर वर कमीत कमी ० ते -३ असेल. तर तुम्ही विचार करा. आम्ही एकमेकांशी बोललो की वर जाऊन बघू आणि नाही जमलं तर लगेच खाली येऊ. इतकी तयारी केली होती आम्ही कपड्यांवर कपडे घालून तर जाऊन तर येऊ. बाकी बघू. असं म्हणून आम्ही निघालो. गोंडोलाचा प्रवास तसा मस्त होता. ती गोंडोला थांबत नाही त्यात ती सुरू असतानाच बसायचं असतं. आम्हाला आईची काळजी होती की तिला जमेल का नाही पण तिने जमवलं. वर जातानाचं दृश्य मस्त होतं एकदम. छान वेळ जात होता. जवळ जवळ २५ मिनिटांनी आम्ही वर पोहोचलो. आणि त्या तिकीट काउंटर वाल्यांनी जसं सांगितलं होतं तसंच झालं. तुफान पाऊस, तुफान थंडी आणि जोरदार हवा. आई बाबांना त्रास व्हायला लागला पण सुदैवाने तिथे कॅन्टीन होतं. तिथे ते जाऊन बसले. आणि दोघांनी कॉफी घेतली.
मी आणि स्नेहलने
विचार केला की इतकं आलो आहोत तर मेन पॉइंट जाऊन बघूया. म्हणून आम्ही निघालो तर तडक
पावसाने भिजवून, हवेने सपके देऊन आणि थंडी ने गोठवून आमचं स्वागत केलं पण तरी मी सुरुवातीला
जसं म्हटलं की सगळे व्यायाम करत असतात, पळत असतात तसे काही उत्साही मंडळी होतेच आणि
त्यांना बघून आम्ही जबरदस्तीचा उत्साह आमच्या अंगात संचारावून घेतला आणि मेन पॉइंटसाठी निघालो. जाताना पूर्ण वाट लागत होती. हात पाय थंडीने चालत नव्हते, पावसाने
आम्ही गच्च भिजलो होतो आणि हवा ढकलत होती. असं कसं बसं करत करत मेन पॉइंटला गेलो.
जाऊन काहीच उपयोग झाला नाही कारण ढगांमुळे दिसत तर काहीच नव्हतं उलटं थंडीने वाट लागली
होती. आम्ही साधारण २ तास हे करत होतो त्यामुळे भूकपण तुफान लागली होती. कसंबसं परत कॅंटीनला पोहोचलो. आणि आई बाबा काळजी करत बसले होते. आम्हाला पाहून पहिले तर त्यांना
अजूनच कसंतरी झालं कारण आम्ही गच्च ओले होतो जॅकेट्स असून देखील. जीन्स तर सगळी ओली
आणि जॅकेटमधून पण आत पाणी गेलं होतं. चेहरा हात सगळं सपक्यांमुळे लाल झालं होतं. आम्ही
पटापट हीटर समोर जाऊन बसलो आणि वाळत होतो. आम्ही पण कॉफी घेतली आणि तिथून निघू असं
म्हणालो. पण वाटलं जेवणाची वेळ झाली आहे तर विचारून घेऊ काही खायला आहे का! तिथल्या
माणसाला विचारलं की आज मेनू काय आहे तर तो म्हणाला १५-२० मिनिट्स मध्ये कळेल. म्हणून
आम्ही ठरवलं की आपण थांबूया. आणि १५-२० मिनिटांनी बघतो तर काय की जसा देव बाप्पा प्रसन्न
व्हावा तसं झालं. जेवायला आपल्या फुलकोबीची भाजी, भारतीय पद्धतीने बनवलेली, ज्यात छान
खोबऱ्याचा कीस घातलेला थोडी रस्सा असलेली आणि सोबत गरमा गरम भात. मग काय सगळी थंडी,
ओलावा सगळं सगळं गायब. प्रत्येकाने एक प्लेट घेतली पोटभर जेवलो आणि मग तिथून निघालो.
आई अन्नपूर्णा प्रसन्न!
शेवटच्या टप्प्यात
आम्ही स्कॉटलंडची राजधानी एडिनबरा (Edinburgh) गाठली. एडिनबरा शहरात प्रवेश करताना
दिसणारा 'द फोर्थ ब्रिज' (The Forth Bridge) हा अडीच किलोमीटर लांबीचा पूल अभियांत्रिकीचा
एक अद्भुत नमुना आहे. त्यावरून जाताना मजा आली पण पाऊस खूप असल्याने नीट दिसला नाही
आम्हाला.
एडिनबरामध्ये आम्ही ऐतिहासिक एडिनबरा कॅसल (Edinburgh Castle) बाहेरून पाहिला. हॅरी पॉटर प्रेमींसाठी हे शहर म्हणजे पर्वणीच! तिथल्या 'डायगन अॅली'वरून (Diagon Alley) प्रेरित असलेल्या गल्लीत फिरताना आणि हॅरी पॉटरचे अधिकृत मर्चेंडाईज बघताना एक वेगळीच जादू जाणवली. स्नेहल Harry Potter ची फॅन तिने तर खूपच आनंद घेतला. आम्ही तिकडे स्कॉटलंड museum पण बघितलं. दिवसभर शहरात फिरलो पण आम्ही कार AirBnB मध्येच ठेवली कारण शहरात गाडी चालवणं आणि पार्किंग शोधणं अवघड होतं. काही बसवाल्यांनी तर आम्ही चुकीच्या बसमध्ये बसलो म्हणून आम्हाला फुकट पुढच्या बस स्टॉपपर्यंत सोडलं. तो दिवस पण आमचा पूर्ण पायी फिरण्यात गेला. ह्यात आई बाबांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे की काहीही तक्रार न करता ते इतके आमच्यासोबत फिरत होते.
निरोप घेताना...
पाचव्या दिवशी जेव्हा आम्ही परतीचा प्रवास सुरू केला, तेव्हा पाऊस आणि ऊन यांच्या खेळातून उमटलेली इंद्रधनुष्ये आम्हाला निरोप देत होती. स्कॉटलंडचा हा प्रवास फक्त प्रेक्षणीय स्थळांचा नव्हता, तर तो निसर्गाच्या सानिध्यात घालवलेल्या अमूल्य क्षणांचा होता. आई बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताना खूप जास्त छान वाटत होतं. मला आणि स्नेहलला असं वाटत होतं की आयुष्यात काहीतरी चांगलं काम केलंय आपण. माझ्या चेहऱ्यावर तर प्रचंड समाधान होतं. काही वर्षांनी स्नेहलचे आई बाबा आले तेव्हा देखील आम्ही हाच टूर त्यांना घडवला. आणि माझ्या चेहऱ्यावर जसा माझ्या आई बाबांना घेऊन फिरण्याचा आनंद होता तसाच आनंद मी स्नेहलच्या डोळ्यात देखील त्यावेळेस पाहत होतो.
जर तुम्हाला शांतता, इतिहास आणि अफाट निसर्ग सौंदर्याची आवड असेल, तर स्कॉटलंडला एकदा तरी नक्की भेट द्या!





No comments:
Post a Comment
प्रतिसाद