Friday, 10 July 2026

२.६ म्युनिचची न्यारी लीला (राहुल बारटक्के)

म्युनिचची न्यारी लीला

राहुल बारटक्के

ट्रिंग ....मोबाईलची घंटा वाजली आणि मनात शंकेची पाल चुकचुकली. रात्री मॅनेजर चा फोन आला....

'मिस्टर. पुढच्या आठवड्यात तुला म्युनिचला जायचे आहे. एक कस्टमर-मीटिंग साठी.'

“काय रे तुझा मॅनेजर बरा आहे ना? यंदा चक्क एका आठवड्याने पाठवतो. नेहमी तर दोन दिवसांची नोटीस असते.“ इति सौ!

सेल्सच्या नोकरीची तिलाही सवय झालीये ...आणि बॅग भरून तयार राहायची मला.

पोरे मात्र एवढेसे तोंड करू बघू लागली....बाबा पुन्हाएवढी प्रेमळ पोरं! मन आनंदाने भरून हवेत तरंगू लागलं! 'बाबा मला स्विमिन्ग आणि क्रिकेटला कोण नेणार?' या पुढच्या वाक्यांनी ते लगेच जमिनीवर आलं! आपण डेसिग्नेटेड चालक या हुद्द्याची प्रकर्षाने जाणीव करून दिली....पूर्वी सालगडी आम्ही चालगडी !

इकडे / तिकडे मित्रांना / टॅक्सी /उबेर इत्यादींना बुकिंग करून त्यांची व्यवस्था करण्याची जबादारी मोठ्या मनाने सौ.ने माझ्या वर टाकली. कार्लला फोन करून विमानतळावर जा-येण्याची बुकिंग ची पण सोय केली

आईला फोन वर सांगितले, तर....

"येताना २-४ मोठी जर्मनची भांडी आण. यंदा अधिक महिना येतोय - जावई बापूंना देऊ!"

"अगं, सोने /चांदी द्यायचे असते ना?"

"असू दे रे. जर्मन भांडयांना  कल्हई दिली कि छान चमकतात. आणि तसंही सोने-चांदी  घेऊ नका असा सरकारचा आदेश आहे आता" .... या पुढे मी काय बोलणार!

रोजची काम आणि तयारी यात पुढचे दिवस पटापट गेले आणि प्रवासाचा दिवस उजाडला...

फ्लाईट संध्याकाळची होती, सकाळची कामे, शाळा सोडणे, शेवटचे प्लानिंग. ऑफिसचे कॉल यात वेळ झटकन केला.

जाण्याची वेळ जवळ आली तशा बायकोच्या सूचनांचा वेगही वाढला.

"इकडे तिकडे हिंडू नकोस!" सौ.

"हम्म."

"ऑक्टोबर-फेस्टमध्ये जास्त उधळू नकोस."

"हम्म."

"पराठे देऊ का?"

"नको ग. म्युनिचमध्ये पोचूनच खाईन आता."

या मधुर सूचनांमध्ये मन गुंतलेले असतानाच कार्ल (वाहनचालक) चा 'मी आलोय' असा संदेश आला. पटकन गाडीत बसलो. आज वेळेत बसलो नाहीतर 'इंडियन स्टॅंडर्ड टाईम'वरून कार्लचं व्याख्यान चालू झालं असतं ...

मग -

'गाडी सुटली, रुमाल हलले
क्षण साधाया भरले डोळे चटकन हसले'

अशा काव्यपंक्ती आठवल्या. अर्थात आज असे  काही घडले नाही. उलट चला चार दिवस तरी सुटले अशा भावार्थाचे मुक्त हास्य देऊन बायकोने रवानगी केली.

कार सुटल्या सुटल्या शेजाराची काळी लुसलुशीत लुसि मनी म्याऊ डोळे मिचकावत कार पुढून पळाली... आता काम फत्ते होणार असा विश्वास मनी आला.

 बर्मिंघम एअरपोर्ट पर्यंतचा प्रवास गप्पिष्ट कार्ल बरोबर सहज केला. त्याच्याशी बोलताना कोणत्याही विषयाची बंधने नसतात. त्याने स्वतः भरपूर भटकंती  केल्यामुळे त्याच्याकडे गप्पांसाठी भरपूर विषय असतात. त्या गप्पा-टप्पांमध्ये वेळ पटकन गेला.

या वेळेस थोडा लवकरच निघाल्यामुळे  वेळेत पोचून इम्मीग्रेशन्स इ. जास्त त्रास होणार नाही आणि बसून थोडी कामं होतील असाही (सु)विचार होता.

पोहचायला २ वाजले आणि ५ ची फ्लाईट त्यामुळे भरपूर वेळ हाताशी होता.

टॅक्सी सोडून दिली आणि बोर्डिंग ला गेलो....तर एका मोठ्या रांगेने माझे स्वागत केलं! हे काय नवीन? पुढच्याला विचारला तर त्यालाही काही कल्पना नाही.पण सिक्युरिटी म्हणाला आज थोडी गर्दी आहे. सुट्टी संपली आणि UEFA फुटबॉल संपल्याने थोडी बहुत गर्दी आहे.

भरपूर वेळ असल्याने मी जास्त काळजी न करता गाणी ऐकत आराम उभा राहिलो रांग हळू हळू धक्का बुक्की न करता पुढे सरकत होती.

मध्ये 'May I go before you?' असा मंजुळ स्वर ऐकू आला 'My flight is at 4.'

'हो, हो, का नाही?' मी नम्रपणे बाजूला  होत म्हटलं. स्त्री-दाक्षिण्य दाखवायची हीच योग्य वेळ. तसेच आपल्याला भरपूर वेळ आहे असा मनात विचार केला.

"तुमची फ्लाईट कधी आहे? अजून एकाने विचारले....

"पाच." 

"माझी सव्वा पाच....बहुतेक आपण पोचणार नाही."

अरे हा असं काय  बोलतोय? मी कानातला इअर फोन बाहेर काढून जरा वैतागून त्याच्याकडे पहिलं आणि लक्षात आलं ....गेल्या एक-दीड तासामध्ये फक्त काही फूटच आम्ही पुढे आलो होतो. रांग आता मारुतीच्या शेपटाप्रमाणे पुढे आणि मागेही भरपूर होती आणि काही अजून बोर्डिंग दार सुद्धा दिसत नव्हतं! 

आधी बोर्डिंगपास मग सिक्युरिटी आणि प्रवेश...मोठाच पल्ला गाठायचा होता आणि आधी शांत वाटणारी माणसं देखील आता वैतागू लागली होती. मुख्य म्हणजे कोणास नेमके काय झालंय काही ठाऊक नव्हतं. त्यामुळे काय करायचे कोणाला विचारायचे काही काळात नव्हतं. शेवटी धाडस करून एका जाड-जाड पोलीसवाल्याला विचारले....तो म्हणाला चेकिंग सिस्टिम डाउन आहेत आणि त्यामुळे थोडा जास्त वेळ लागतोय. या गडबडीत ४.३० वाजत आलेले आणि मी अजून बाहेरच. आता फ्लाईट हुकणारच असे वाटू लागलं....

शेवटी, कधी विनवणी करत  कधी चक्क घुसखोरी करत ...जमेल तसे जागा मिळेल तिथे वाट सापडेल तिकडे .... भारतात कधीही कुठेही कितीही ट्रॅफिक असतानाही रस्ता मधोमध ओलांडण्याचा अनुभव पणाला लावून कसाबसा कसाबसा  बोर्डिंग पासेस घ्यायला पोचलो तेव्हा ४.४५ वाजले होते ....

समोर एक सुंदर एअरलाईनवाली दिसली. तिला  माझा प्रॉब्लेम सांगितला. ती म्हणाली  "डार्लिंग तुझ्या  फ्लाईटचं बोर्डिंग बंद झालंय!"

आयला उद्या सकाळची कस्टमर मीटिंग हुकणार आता! मी एकदम काकुळतीला आलो. माझा गरीब चेहरा पाहून तिला का कुणास ठाऊक माझी दया आली....म्हटली मी लास्ट फ्लाईट (७ वाजता) चे एक तिकीट देते...पण या रांगेतून पुढे  कसे जायचे तुझे तूच बघ.

तिच्याकडून तिकीट घेऊन रांगेत परत येईस्तोवर ५.३० झालेले. आता बोर्डिंग पास असल्याने मी थोडा सुटकेचा निश्वास सोडत होतो. तोच सिक्युरिटी रांग त्याच्या दुप्पट! अरे देवा! आता कसं करायचं? आणि पुढे जायचं तर सगळ्यांच्याच फ्लाईट्स अडकलेल्या...सगळे वैतागलेले आणि त्यामुळे चिडचिडलेले. 

UEFA अंतिम सामना हरलेले डार्टमोंड चाहते अजूनच सटकलेले.आणि गोल अडवल्यासारखे मुद्दाम इतरांना पुढे  येऊ देत नव्हते! हेच जर मॅचमध्ये केलं असतं तर जिंकला नसतात का? असं त्यांच्या तोंडावर सुनावावं वाटले....पण त्याच्या देहयष्टीकडे म्हणून तो विचार मी मनातच गिळला. 

तेव्हढ्यात एक शहाणा ऑफिसर पुढे आला. त्याने प्राधान्य-क्रमानुसार  (ज्यांच्या) आधी फ्लाईट्स त्यांच्या रांगा वेगळ्या अशी मांडणी केली आणि जत्था नीट पुढे सरकू लागला आणि आम्ही सिक्युरिटीतून ६.३५ ला बाहेर पडलो हुश्श! आणि उद्घोषणा (announcement) झाली. या फ्लाईटवाल्यासाठी लास्ट कॉल ....६.४५ ला दार बंद होतील......बापरे बोर्डिंग गेट १०मिनिटं (चालत) दाखवत होते. आता काय? मी लॅपटॉप बॅग घेऊन धुम्म! ७ मिनिटात दारात - पूर्ण घामाघूम होऊन. लोक काय ध्यान आहे असे बघत होते...पण हुत! मी मॅरेथॉन विजयी वीराप्रमाणे आपली सीट पटकावली. हुश्श! एकदाची फ्लाईट सुटली. स्वतःशीच मी एक शीळ घातली...

आता पुढची सहल सुखरूप पार पडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

मजल दरमजल करत आम्ही म्युनिचला पोहोचलो. दुपारी बर्मिंगहॅम मध्ये झालेल्या घोळाने दुपारचे जेवण मिस झालेलं आणि आता पोटात चांगलेच कावळे ओरडू लागले होते. उतरल्या उतरल्या मस्त विमानतळावरच डिनर करूया आणि मग हॉटेलमध्ये असा सुज्ञ विचार मी केला.....

म्युनिच जर्मनी ची तिसरं मोठे शहर आणि ऐतेहासिक. त्यामुळे खूप उत्सुकता होती. विमानतळ सुंदर होता. लुफ्तान्साची ऐट सगळी कडे झळकत होती.....

इकडे पोटात भुकेने कावळे ओरडत होते आणि  नजर अक्ख्या विमानतळावर रेस्टॉरंट्स शोधत होती. कोणी अन्न देता का? आणि सगळी रेस्टॉरंट्स बंद. बंद म्हणजे बंद एकदम चिडीचूप. सगळीकडे भयाण शांतता!

तेवढ्यात "तरी मी सांगत होते ४ पराठे घेऊन जा! माझं मेलीचं ऐकतोय कोण?" असा हिचा आवाज ऐकू आला. मी दचकून इकडे तिकडे पाहिलं... हुश्श... मी एकटाच होतो.

लग्नाच्या ठराविक वर्षानंतर पुरुषाला एकांतातही चूक होताच बायकोचा आवाज ऐकू येणे आणि स्त्रीला आताही हा काहीतरी घोळ घालत असणार असे वाटणे हाच समृद्ध वैवाहिक जीवनाचा समसमा योग!

इम्मीग्रेशनचे सोपस्कार तसे सहज सोपे होते. हुश्श! आता हॉटेल वर जाऊन पडी टाकूया म्हणून बॅग्स घ्यायला गेलो.

"डार्लिंग..आम्हाला वाटलं तुझी फ्लाईट मिस झाली  म्हणून आम्ही तुझे बॅग्स या फ्लाईट मध्ये लोड केले नाही."...ओयईईईईईईई.... म्हंणजे ...

"म्हणजे ते २-३ दिवसात येतील तुमच्याकडे."

"अहो ताई, २-३ दिवसात आम्ही माघारी जाणार!"

"आमच्यातर्फे ही कॉम्पलीमेंटरी बॅग, ज्यात एक टी शर्ट पण दिला आहे."

म्हणजे आता उद्या कस्टमर मीटिंगमध्ये टी शर्ट+ बर्मुडा....

"वि आर  सॉरी" म्हणून तिने विंडो बंद केली.... 

हम्म. आलिया भोगासी म्हणून मी टॅक्सी बुक करायचा प्रयत्न केला. तो थोडा खटापिटीने यशस्वी झाला.

आता हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये काही तरी घेवूया असे म्हणत मी निघालो.

थंडी वाढू लागली होती. कदाचित आज हिमवर्षाव होईल असं टॅक्सीवाला म्हणाला. झोप आणि भूक भरपूर लागली होती. त्यामुळे काही ना बोलताच प्रवास पूर्ण केला.

हॉटेलवर पोचलो की ताणून द्यायची असं मनाचं आणि पोटाचं समाधान करत होतो.

हॉटेलवर पोचलो आणि टॅक्सी भुर्रकन गेली- आता मे और मेरी तनहाई!

हॉटेलचा दरवाजा बंद होता आणि रिसेप्शन पण! अरे हे काय नवीन? जवळ जाऊन पाहतो तर नोटीस - रात्री ११ नंतर आल्यास मागील दरवाज्यावर जावे! ठीक आहे, मी मागे गेलो ....तिथं बी कुणी नाय! आता काय ? नवीन नोटीस. स्वतःच्या किल्ली साठी पिन कोड द्या. आणि आमच्या ऑफिसने पिन कोड दिलाच नव्हता!आता काय ?

इकडे तिकडे कोणी दिसतंय का तर एक चिट पाखरू पण नाही! ऑफिस सकाळीच 7 नंतर उघडणार.... आजूबाजूला सगळे गॅरेजेस आणि वेअरहोऊसेस, माणसे नाहीतच! तशीही यांच्याकडे माणसे कमी आणि यंत्रे जास्त!

दिवसभराच्या धावपळी आणि उपासमारी ने शरीराची आणि मनाची बॅटरी डाउन व्हायला लागली आणि मोबाईलच्या बॅटरी पण मान टाकली - आता काय?

अशा वेळी दुसरे काही नाही पण देव आठवतो. अनाश्या पोटी केलेली प्रार्थना देवाकडे लगेच पोचते असे म्हणतात.... अगदी तसंच काहीसं झालं .

आणि वरून हिमवर्षाव चालू झाला. देव निसर्गात आहे - खरंय पण आत्ता असं?

पोटात अन्नाचा  कण  नाही.... सकाळच्या धावपळीने शरीर आणि मन दोन्ही थकलेले...हृदयाचे ठोकेही मंद होऊ लागले. 

आणि वरून हा जोराचा हिमवर्षाव! अशी वेळ का यावी आपल्यावर की आता वेळ आली आपली? असा विचार येताच क्षणी त्याने उत्तर पाठवले. रादर, उत्तरा  पाठवली!

समोरूनच गजगामिनी पांढरी शुभ्र वेषात शुभ्र कांती, शुभ्र दंती एक तरुणी जवळ आली! जणू अप्सरा आणि मला स्वतःची हृदयाची धडकन हळू हळू ऐकू येऊ लागली!

'तेरी लीला हे सबसे न्यारी' असं काहीसं जाणवलं.

"तुम्ही असे बाहेर कसे?" ती.

'तुम्हारी यादों मे खडा हू, इन राहो मे.....' असं फिल्मी उत्तर देऊन तिला इंप्रेस करायचा विचार होता....पण आता आपली वेळ गेली हे लक्षात घेऊन मी शांत!

"तुम्ही आधी आत या."  मी मुंडी हलवली.....

आपण तर काही पुण्य केले नाही पण आज अप्सरा दर्शन कसे घडले आणि का घडले असा विचार करतच आम्ही तिच्या चावीने दार उघडून आत आलो.... 

तिने माझी अवस्था बघून एक हीटर लावला. २-३ ब्लँकेट्स दिली, गरमागरम कॉफी दिली. हळू हळू डोके ताळ्यावर आले. तिच्याकडूनच चार्जेर घेतला. मोबाइलला चार्ज आल्यावर तोही शहाणा झाला....पटापट निर्णय घेतला. दुसऱ्या हॉटेलचं बुकिंग केले, टॅक्सी बुक केली. दुसऱ्या हॉटेल मध्ये पळालो आणि पांघरुणात जाऊन लुडकलो... हुश्श!

 दुसऱ्या दिवशी सकाळी बायकोचा फोन.

"प्रवास कसा झाला?" सौ.

"छान!" मी. 

"फोन नाही केला...."

"बॅटरी गेली."

"का भेटली कोणी सटवी?"

"हो फारच प्रेमळ  होती ती."

"काहीही हा श्री! दोन पोरांचे ढेरपोटे बाप तुम्ही! तुम्हाला कोण बघणार? खी: खी:".  

"हम्म.जिसका कोई नही ऊसका खुदा हे यारों :)  (हे मनातल्या मनात.)

मधल्या काळात थोडी कपडे खरेदी करावी लागली. पण लुफ्तान्साने दोन दिवसांतच बॅग्स सुपूर्त केल्या. उरलेले दिवस गडबडीचे पण विना भानगडींचे गेले!

बाकी परतीचा प्रवास उत्तम झाला. येताना परत कार्ल आला होता. मस्त गप्पा आणि माझ्या अतरंगी अनुभवावर 'You should sue these buggers...' असा टिपिकल ब्रिटिश सल्लाही दिला! 

घर जवळ येताच शेजारची लुसलुशीत काळी लुसि डोळे मिचकावून हसली. घरवालीनं 'आलं माझं ध्यान!' असं म्हणत स्वागत केलं.. आईला जर्मनीमध्ये जर्मनची भांडी मिळत नाहीत याचं जाम आश्चर्य वाटलं. पोरांनी उड्या मारत  उद्या इकडे / परवा तिकडे असे ड्रायविंग स्लॉट्स  ठरवून टाकले. संध्याकाळी मस्त बाहेर जेवायला गेलो. 

जेवतानाच मोबाइलला ची रिंग वाजली ...ट्रिंग....

'मिस्टर! पुढच्या आठवड्यात बार्सिलोना.....महत्वाची मीटिंग आहे :) 

- राहुल बारटक्के, स्टॅफोर्ड, यु. के.  

No comments:

Post a Comment

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर