जय जय राम कृष्ण हरी
तुषार क्षीरसागर
लंडनमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उभारण्याचा विचार काही भक्तांच्या मनात आकार घेत होता. ही बातमी विविध WhatsApp समूहांमधून पसरताच ती अनेकांच्या अंतःकरणाला स्पर्शून गेली. परदेशात राहूनही आपल्या संस्कृतीशी, आपल्या देवाशी पुन्हा एकदा जोडले जाण्याची ही एक अनमोल संधी होती—जणू जगदंबेनेच दिलेली एक दिव्य हाक!
ही बातमी ऐकल्यापासून मनात सतत एकच विचार घोळत होता—“स्वतः विठू माऊली UK मध्ये येऊन दर्शन देणार असतील, तर त्यांच्या स्वागतासाठी आपण काय करू शकतो?”
या विचारांतूनच एक सुंदर आणि भावपूर्ण कल्पना जन्माला आली—“आपणही UK मध्ये पंढरपूर वारीप्रमाणे पायी वारी करूया!”
भक्त एक पाऊल पुढे टाकतो, तेव्हा देव दहा पावले पुढे येतो, असे म्हणतात. कदाचित त्याच भावनेने आम्ही दोघे मित्र एकाच ध्यासाने वारीसाठी सज्ज झालो.
भगवंताच्या कृपेवर पूर्ण विश्वास होता; तरीही प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक होते. म्हणून सलग सात दिवस प्रत्यक्ष सराव केला. स्थानिक रस्ते, अरुंद फूटपाथ, मोठी शेतं अशा विविध मार्गांवरून चालत स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार करण्याचा प्रयत्न केला. हा केवळ चालण्याचा सराव नव्हता, तर एका साधनेसाठीची तयारी होती.
याआधी इतका लांब पायी प्रवास कधीच केला नव्हता. त्यामुळे लवकरच जाणवलं की केवळ उत्साह पुरेसा नसतो; योग्य मार्गदर्शनही तितकेच महत्त्वाचे असते. अनुभवी वॉकरकडून सल्ला घेतला. पावलांचा वेग, विश्रांतीची पद्धत, शरीराचे संकेत ओळखणे—अशा अनेक छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या.
आधुनिक साधनांचाही योग्य वापर करण्याचे ठरवले—मोबाईल, हलके आणि लवकर वाळणारे कपडे, योग्य फूट वेअर, हलकी सॅक अशा गोष्टींची तयारी केली. Google Maps च्या साहाय्याने संपूर्ण मार्ग, अंतर, वेळ आणि मुक्काम यांचे नियोजन करण्यात आले.
तीन आठवड्यांची सलग रजा घेणे शक्य नसल्यामुळे, वारीसोबत ऑफिसचे कामही शक्य तिथे आणि शक्य त्या वेळेत करण्याचे आम्ही आधीच ठरवले होते. महत्त्वाच्या मीटिंग्स शक्यतो दुपारच्या वेळेत ठेवायच्या, जेणेकरून एखाद्या पार्क, कॅफे किंवा मित्रांच्या घरी बसून काम करता येईल, अशी योजना केली होती.
वारीच्या पहिल्याच दिवशीदेखील एक महत्त्वाची ऑफिस मीटिंग मित्रांच्या घरी पोहोचून करण्याचे नियोजन होते. मात्र चालण्यात थोडा उशीर झाल्यामुळे आम्ही वेळेत तिथे पोहोचू शकलो नाही आणि शेवटी एका Leisure Centre च्या पटांगणात बसून लॅपटॉपवर मीटिंग अटेंड करावी लागली! तेव्हा मनात एक विचार आला—जर प्रत्येक गोष्ट आपल्या नियोजनाप्रमाणेच झाली, तर कदाचित त्याचा अहंकार निर्माण होईल. म्हणून पुढे जे काही होईल ते भगवंताच्या इच्छेनेच होऊ द्यायचे, असे ठरवून आम्ही पुढे निघालो.
पहिल्या दिवशीचे रस्ते परिचित होते. रोज कारमधून दिसणारे तेच रस्ते आज पायी चालताना पूर्णपणे वेगळे भासत होते.
सरावामुळे पायांना फोड आले होते. त्यात प्रचंड उष्णता. सहजच मनात विचार आला—“इथे कुठेतरी पाणी मिळाले तर किती बरे होईल!” आणि आश्चर्य म्हणजे पुढच्या काही अंतरावरच एक पाणपोई दिसली! इंग्लंडमध्ये जिथे रेस्टॉरंटमध्ये पाणी विकत घ्यावे लागते, तिथे वाहते पाणी हात-पाय धुण्यासाठी आणि पिण्यासाठी उपलब्ध पाहून आम्ही भारावून गेलो.
पहिल्या दिवशी ज्या कुटुंबाकडे मुक्काम केला, त्यांना आम्ही याआधी कधी भेटलोही नव्हतो. पण त्यांनी प्रेमाने घराचे दरवाजे उघडले, स्वादिष्ट भोजन दिले आणि रात्री उशिरापर्यंत माऊलींच्या वारीच्या गप्पा रंगल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी Google Maps च्या आधाराने मार्गक्रमण करत असताना आम्ही थोडासा रस्ता भरकटलो. एका स्थानिक ब्रिटिश महिलेने आम्हाला कॅनलच्या बाजूच्या टोपाथ ने जाण्याचा सल्ला दिला. “रस्ता सोपा आणि थंड असेल,” असे ती म्हणाली. तिचा सल्ला मानून आम्ही पुढे निघालो. कालव्याच्या काठाने चालताना बदके, हंस आणि त्यांची पिल्ले दिसत होती. त्या पक्ष्यांची आपल्या पिल्लांबद्दलची जागरूकता पाहून नकळत मातृत्वाची अनुभूती झाली.
या कालव्याच्या काठाने चालताना आम्ही एका अरुंद बोटीला बंद गेट्स च्या आतमध्ये अलगद स्थिरावताना पाहत होतो. मागील दरवाजे हळूच बंद झाले आणि मंद, घुमणाऱ्या प्रवाहध्वनीसह पाण्याची पातळी वाढू लागली—जणू काही अदृश्य हातांनी ती बोट हळूहळू वर उचलली जात होती.
जेव्हा बोट एका कॅनलमधून दुसऱ्या, वेगळ्या उंचीच्या कॅनलमध्ये प्रवेश करते, तेव्हा पाण्याची पातळी दोन्ही बाजूंनी समसमान होईपर्यंत हळूहळू समायोजित केली जाते आणि त्यानंतरच दरवाजे उघडले जातात. विशेष म्हणजे ही संपूर्ण यंत्रणा बोटीवरील प्रवासी किंवा ऑपरेटर अत्यंत संयमाने आणि कौशल्याने हाताळतात. ही प्रक्रिया अतिशय वेळ घेणारी असल्यामुळे तिथे उभं राहून पाहताना “संयम” या शब्दाचा खरा अर्थ उमगला.
Sandbach जवळ हिंदू स्वयंसेवक संघाच्या Crewe शाखेत जाण्याचा योग आला. तेथे माऊलींचा गजर, भजन आणि प्रबोधनाचा सुंदर कार्यक्रम झाला. परस्परांच्या पाया पडून आदर व्यक्त करत आम्ही पुढे निघालो.
दोन दिवसांत ३०-३५ मैल अंतर पार झाले होते. पण सततच्या चालण्यामुळे पायांना फोड आले होते. तरीही माऊलींच्या भेटीच्या ओढीत वेदना जाणवत नव्हत्या. कोणीतरी शूज बदलण्याचा सल्ला दिला. योगायोग असा की वाटेतच एक शॉपिंग सेंटर लागले आणि रेकमेंडेड शूजमध्ये आमच्या साइजचा शेवटचा जोड उपलब्ध होता! तो भगवंताचा प्रसादच वाटला. विशेष म्हणजे सेल्स पर्सनने आमच्या वारीचा उद्देश समजून आनंदाने डिस्काउंटसुद्धा दिला.
Stoke ते Stafford हा प्रवास सर्वांत कठीण टप्पा होता—लांबचा पल्ला, चढ-उतार, विरळ लोकवस्ती आणि सुंदर निसर्ग. वॉटरप्रूफ जॅकेट न घेतल्याने अचानक आलेल्या पावसात आम्ही पूर्ण भिजलो. पण “वारीला वारी लागतेच” याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
प्रत्येक दिवशी कोणी ना कोणी वारीत सहभागी होत असे. कोणी पाच मैल, तर कोणी पूर्ण दिवस सोबत चालत असे. “जय हरी विठ्ठल”, “राम कृष्ण हरी”, “ज्ञानबा तुकाराम” यांच्या गजरात वेळ कसा निघून जायचा ते कळतच नसे.
रात्री सेवेकऱ्यांच्या घरी मुक्काम, भजन-कीर्तन, प्रबोधन, सुग्रास भोजन आणि वारीच्या गप्पा—हा नित्यक्रमच झाला होता.
प्रत्येक ठिकाणी मनापासून स्वागत झाले. अनेक अनोळखी लोकही आपलेसे वाटू लागले. प्रत्येकाच्या मनात एकच भावना—“वारीसाठी आपण काय करू शकतो?” महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ सर्वांच्या मनात सारखीच होती.
वारीचा मार्ग निश्चित होता; पण मुक्कामाची व्यवस्था बहुतेक वेळा एक-दोन दिवस आधीच ठरत असे. तरीही माऊलींच्या कृपेने सर्व काही सुरळीत होत गेले. कोणी फोनवरून, कोणी ओळखीने, तर कोणी पूर्ण अनोळखी असूनही प्रेमाने राहण्याची व्यवस्था केली. तेव्हा जाणवलं—भारत असो वा UK, माऊलींसाठी लोकांच्या मनातील भाव एकच असतो. खरा देव आम्हाला या माणसांतच भेटला.
वाटेत असंख्य शेतं लागली—गहू, मोहरी, मटार… कधी त्यांचा आस्वादही घेता आला. एकदा तर अचानक पायवाट संपली आणि समोर भरधाव वाहतूक असलेला रस्ता आला. काही वेळ तिथेच बसून विश्रांती घेतली, आणि बाजूला नजरेस पडली चेरीची झाडं! ही झाडं खासगी नसून सार्वजनिक जागेत असल्यामुळे आम्हाला त्यांचा आस्वाद घेण्याचीही संधी मिळाली. जणू भगवंतानेच आमच्यासाठी प्रसादाची व्यवस्था केली होती.
Leamington Spa जवळ एका प्रचंड उष्ण दिवसात आमचे पाणी संपत आले होते. “आता पुढे कुठे काही मिळेल?” असा विचार करत असतानाच “कृष्णा” नावाचे रेस्टॉरंट दिसले. यु. के. मध्ये गावाकडील रेस्टॉरंटस् साधारण संध्याकाळी उघडतात; पण हे रेस्टॉरंट त्या वेळी खुले होते. आत गेल्यावर मॅनेजर पुण्याचा निघाला! त्याला वारीची माहिती होती. त्याने प्रेमाने भोजनाची व्यवस्था केली. त्याच वेळी आमच्या ऑफिस मीटिंग्ससुद्धा पूर्ण झाल्या. पुढे नेटवर्क मिळणार नव्हते, हे नंतर समजले. जगदंबेची कृपा अजून काय असते?
अशाच एका दिवशी Bicester ते Thame मार्गावर भर उन्हात चालत असताना अचानक झाडांनी आच्छादलेली अरुंद पायवाट लागली—जणू निसर्गानेच आमच्यासाठी सावलीचे भुयार तयार केले होते.
असे असंख्य अनुभव घेत, ठरल्याप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही १७ दिवसांनी Slough येथे पोहोचलो. तिथे असंख्य भक्त जमले होते—अगदी पंढरपूरच्या वारीची अनुभूती देणारे वातावरण! विठ्ठलाच्या पादुकांचे दर्शन झाले, अभिषेक झाला आणि संपूर्ण परिसर “जय जय राम कृष्ण हरी”च्या गजराने दुमदुमून गेला.
**“विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ!”**
वारी ही केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारी यात्रा नाही. ती एक आत्मिक, शारीरिक आणि सामाजिक अनुभव आहे. आरोग्य, आव्हान, तप, समाजप्रबोधन आणि विठू माऊलींची भेट—या सर्वांचा सुंदर संगम म्हणजे वारी. आणि त्या योगानुभवाची प्रचिती आम्हाला या प्रवासात प्रत्येक क्षणी येत राहिली.
राम कृष्ण हरी!!!
- तुषार क्षीरसागर, वॉरिंग्टन, यु. के.
No comments:
Post a Comment
प्रतिसाद