Friday, 10 July 2026

३.६ भ्रमंतीची गोड आठवण (करुणा नेहरकर)

भ्रमंतीची गोड आठवण

करुणा नेहरकर 

भ्रमंती जगाची ही इच्छा मनीची 
देव जाणे भेट होणार कोण कोणत्या ठिकाणची 
तूर्तास आठवण सांगते बालपणीची 
अनुभवली होती सहल एक आनंदाची 

जुन्नर तालुक्यात एक छोटंसं माझं खेडेगाव
बालपणी नव्हता तिथे आनंदाचा अभाव 
गावात होती शाळा जिल्हा परिषदेची 
आमच्यासाठी होती ती पर्वणी गमती जमतीची 

शाळेची पावसाळी सहल हमखास जायची 
निवड दरवर्षी ठरलेली एकाच ठिकाणची 
गावापासून दूर होते मोठे मोठे डोंगर 
डोंगरावर होतं कळमजा देवीचं मंदीर 

देवीच्या दर्शनाला सहल सकाळी निघायची 
दोघे दोघे हात धरून मुले रांगेत चालायची 
वाटेच्या दुतर्फा शेती आनंदाने डोलायची 
जणू आनंदात आमच्या ती समरस व्हायची 

पोहचल्यावर मुलांना गोलाकार बसवलं जायचं 
झाडाच्या सावलीत त्यांना विसावलं जायचं 
बाई गुरुजी मुलांना सूचना देतं असायचे 
काळजी प्रत्येक विद्यार्थ्याची भारी ते घ्यायचे 

डोंगरातील खडकावर जपून खेळा सांगायचे 
शेवाळलेल्या दगडावर पाय जपून ठेवा म्हणायचे 
वाहणाऱ्या झऱ्यात मग आम्ही पण खेळायचो 
आनंदाने सगळेच भिजायचो आणि भिजवायचो 

झऱ्यातल्या खेकडयांना दिला दगड मारून त्रास 
पिसारे मिळवायला पळालो मोरामागे हमखास 
माकडाला पाहून मारल्या उड्या झाडावर
ससे पाहून धावलो त्यांच्या मागे भराभर 

सहलीत मग्न होऊन जरी विसरलो सर्व काही 
साप, विंचू, बिबट्याला कधी विसरलो नाही 
दहशत त्यांची आजही तशीच आहे 
किंबहुना आजकाल ती जास्त वाढली आहे 

दुपारच्यावेळी पुन्हा झाडाखाली बसायचो 
सगळे मिळून वनभोजनाचा आनंद घ्यायचो 
जेवणानंतर वेगवेगळे खेळ विद्यार्थी खेळत 
डोंगरात फिरून गोड आंबट रानमेवा शोधत 

चाहूल जरा लागता संध्याकाळची 
शिट्टी गुरुजींची कानावर पडायची 
विद्यार्थी देखील जमा होत भरभर
त्या एकाच गुरुजींच्या ईशाऱ्यावर 

रांगेत मुले पुन्हा परतीची वाट धरायची 
काय अनुभवलं दिवसभरात याच गप्पा करायची 
ठिकाण जरी सहलीचं डोंगरात असायचं 
त्याचं सुद्धा त्यावेळी मोठं नवलच असायचं

प्राथमिक शाळेत मिळाले अनुभव नवे नवे 
अजूनही वाटतात ते हवे हवे 
जग बघायला सुरुवात तिथूनच झाली 
परीक्षणाची अनोखी दृष्टी नवी आली 

आठवण भारी या डोंगरातील सहलीची 
इथूनच सुरवात झाली जीवनात भ्रमंतीची 
अविष्कार निसर्गाचा अनुभवला जवळून 
आठवणींनी त्या ठेवले मनात घर करून 

– करुणा नेहरकर, यु. के. 

No comments:

Post a Comment

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर