कोलंबसाचे निवृत्ती गीत
आश्विन जावडेकर (अजब)
नको ती भ्रमंती, नको दूर जाणे
करू बंद फिरणे, म्हणू एक गाणे...
करू बंद फिरणे, म्हणू एक गाणे...
कशाला किनारे, कशाला समुद्र
कशाला खलाशी, जहाजे प्रचंड
उगाचच कशाला जिवा त्रास देणे...
दिशाहीन फिरणे नकोसे अता
नभाला गवसणे नकोसे अता
नको वादळे अन नको शीड तुटणे...
नवा यत्न, नवा ध्यास, नवे स्वप्न, काही
जगाला कशाचेच अप्रूप नाही
पुरे आज वाटे नवे शोध घेणे...
मनाची भ्रमंतीच उत्तम भ्रमंती
नसे त्यात चिंता, कसलीच भीती
बसूया घरी शांत, थकल्याप्रमाणे...
- आश्विन जावडेकर ('अजब'), मॅंचेस्टर, यु. के.
(कुसुमाग्रजांच्या 'कोलंबसाच्या गर्वगीता' वरून आणि त्यांची क्षमा मागून)
ही रचना खूप विचार करायला लावणारी आहे. बाहेर भ्रमंतीत सुख शोधणाऱ्या मनाला थांबून विचारावंसं वाटतं, खरी शांती नक्की कुठे आहे. "मनाची भ्रमंतीच उत्तम भ्रमंती" ही ओळ तर कवितेचा गाभाच आहे. शेवटची "बसूया घरी शांत, थकल्याप्रमाणे" ही ओळ मनाला हळवेपणाने स्पर्शून जाते. वाचताना एक संथ, विचारी प्रवाह जाणवतो. अशा सुंदर आणि अंतर्मुख करणाऱ्या रचनेबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक.
ReplyDeleteविश्लेषणात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
Delete