भ्रमण-निसर्गाची किमया
मीरा पट्टलवार
आपण प्रवास करतो तो निवांत वेळ घालवायला किंवा नवीन ठिकाणं बघायला. पण आपल्यासारखेच आणखीन बरेचसे जीव निसर्गात आहेत ज्यांचा प्रवास ऋतुचक्रावर अवलंबून असतो. निसर्ग नियमानुसार कुठल्या ऋतूत कोण कुठे भ्रमण करणार किंवा स्थलांतर करणार ही योजना त्या सृष्टीकर्त्याची. इंग्लंडच्या ईशान्येला नॉर्थ अंबरलँड या भागात फार्न आयलँड हे सागरी पक्षांचं अत्यंत आवडतं ठिकाण. भरतीच्या पातळीनुसार या १५ ते २० खडकाळ बेटं मिळून फॉर्न द्वीपसमूह तयार झाला आहे. तो आतील (इनर) आणि बाहेरील (आउटर) अशा दोन गटांमध्ये विभागलेला आहे. सुप्रसिद्ध वन्यप्राणी तज्ञ सर डेविड अटेनबरो यांचंही इंग्लंडमधील हे सर्वात आवडतं ठिकाण.
या टेकड्यांच्या बाजू-बाजूने जात जात, त्यावरील पक्षी
पहात दोन तासांनी आमची बोट इनर फार्न या बेटावर पोचली. या
बेटावर आपल्याला उतरता येतं. इथे फिरायला आम्हाला साधारणतः
एक तासाचा अवधी दिला होता. उतरल्या उतरल्या ऑईस्टर कॅचरने आमचं स्वागत केलं. पुढे
गेल्यावर आर्क्टिक टर्न यांचं सामूहिक नृत्य सुरू होतं. त्यातील एक एक पक्षी आमच्या डोक्यावर येऊन बसायला लागले. पर्यटकांच्या डोक्यावर बसायला त्यांना
का आवडतं हे मात्र कळलं नाही. पण
प्रत्येकाच्या डोक्यावर ते बसत होते. पण त्यामुळे खूप मजा आली ते जणू काही
आशीर्वादच देत होते. आर्क्टिक टर्नचे वैशिष्ट्य म्हणजे
वर्षभरात ते जवळपास ६०००० मैल अंतर प्रवास
करतात. उन्हाळा संपला की ते अंटार्क्टिका भागात जातात. सगळ्यात लांबचा प्रवास करणारे किंवा दीर्घ स्थलांतर
करणारे, हे आर्क्टिक टर्न उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत जातात अशी
नोंद संशोधकांनी केली आहे.
बेटावर अजून थोडं पुढे
गेल्यानंतर सुंदर रंगीत अटलांटिक पफिन्स, म्हणजे सी-पॅरोट
किंवा समुद्री पोपट, छोट्या छोट्या खळगीवजा बीळांच्या
अवतीभवती फिरत होते. पिल्लांकरता मासे आणून त्या खळग्यांत त्यांची सतत ये-जा सुरू
होती. पफिन्सची विशेषतः! म्हणजे ते आपल्या चोचीत एकाच
वेळी आठ दहा मासे धरतात. हजारोंच्या संख्येने हे इथे
स्थलांतर करतात. उन्हाळा संपला की आईस लँड, नॉर्वे ह्या भागात परत फिरतात.
याशिवाय रेझर बिल, गिलीमोट,
युरोपियन ब्लॅक हेडेड गल, किटीवॅट,
कॉमन आयडर, असे कितीतरी पक्षी आम्हाला या
बेटावर दिसले. बोटीत परत येण्याची वेळ होईपर्यंत किती
पक्षी कॅमेरात टिपावे आणि किती नको अशी आमची अवस्था झाली.
- मीरा पट्टलवार, ऋणकर्ण, यु. के.




No comments:
Post a Comment
प्रतिसाद