Friday, 10 July 2026

३.५ ओढ (लीना फाटक)

ओढ

- लीना फाटक

'बच्चा बोला देखकर मस्जिद आलीशान 
अल्ला तेरे एक को, इतना बडा मकान'

निजा फाजली यांचे दोहे.  

'पोर बोलले पाहून, मशीद आलीशान
अल्ला एकट्या तुलाच, घर केवढे महान'

श्री. सदानंद डबीर यांचा भावानुवाद.

वरील निदा फाजली यांचे दोहे आणि श्री. सदानंद डबीर यांनी केलेला त्याचा भावानुवाद वाचला. त्यात त्यांनी मस्जिद हे अल्लाचे एकट्याचे व आलिशान घर आहे असं म्हटलं आहे. आपणही मंदिर हे आपल्या पण देवाचं घर आहे असं म्हणतोच. माझ्या मनात विचार आला की आपण, आपल्या भारतीय, हिंदू संस्कृतीमध्ये परमेश्वर हा सर्वव्यापी आहे.  प्रत्येक अणुरेणूमध्ये, चराचरात परमेश्वर आहे असं आपण मानतो.  मग एवढ्या सर्वव्यापी परमेश्वराला फक्त "मंदिर" हेच इतकं छोटंसं घर असून कसं चालेल? एवढ्या सर्वव्यापी परमेश्वराचं "अंतराळ" हेच  घर असू शकेल. आणि एकदा घर म्हटलं की त्या घराला आत जायला व बाहेर पडायला  दार असायलाच हवं. अंतराळातून आपण पृथ्वीवर जन्म घेतो. आणि सर्व कर्तव्यं, कर्मं, जबाबदारी पार पडली की मृत्यूच्या द्वारे परत आपण आपल्या अंतराळातील घरामध्ये जातो. अंतराळातून पृथ्वीवर यायला जन्म हेच एक दार आहे. आणि नंतर जन्म संपला की मृत्यूच्या दारातून परत अंतराळात विलीन होतो. अशी जन्म आणि मृत्यू ही या "अंतराळाच्या" घराची दारे आहेत. आणि या सगळ्या विचारातून "ओढ"  हा अभंग माझ्या हातून लिहिला गेला. तो तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते.  धन्यवाद.

"ओढ"  

सर्व अंतराळ
देवा तुझे घर 
एकच ते दार
"जन्म-मृत्यु"  ||१||
 
मालक घराचा
असे तू एकला 
निवारा आम्हाला
तूच देशी ||२||

लोभ मोह माया
सुटेना आम्हाला 
करी सर्वकाला 
येरझारा ||३||

चिरंतन स्थान 
नसे  सर्वजना
संत महंतांना
मोक्ष देशी ||४||

वंदिते चरण 
सुटो कर्म-काम
मुखी राहो नाम
अखंडित ||५||

लागली मनासी 
ओढ तुझी फार
उघडरे दार 
झडकरी ||६|| 

"अभंग" या छंदात केलेली रचना. 

लीना फाटक, वाॅरिंग्टन, यु. के.  
२२ जानेवारी २०२६.

11 comments:

  1. खूप छान लेख, ओढ, मला वाटतं blackwhole हेच दार असावे. भजन लगेच सुचलेल्या चालीवर गायले सुद्धा. धन्यवाद 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून खुप खुप धन्यवाद. व नुसताच आवडला नाही तर उत्स्फूर्त पणे आपण तो गाऊन पाठवलाय. त्याचा आनंद तर झालाच आहे. पण तो माझा खुप मोठ्ठा ऑनर आहे. असे मी समजते. मनःपूर्वक आभार.

      Delete
  2. लीना मावशी, आपण खूप सुंदर आणि भावपूर्ण रचना केली आहे. आणि ती आपल्याला कशी सुचली हे पण सांगितल्यामुळे ती अधिक प्रभावी वाटते.

    अभिनंदन

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्हाला "अभंग" आवडल्याचे वाचून खूप आनंद वाटतोय. असाच लोभ राहू द्यावा. धन्यवाद. लिना फाटक

      Delete
  3. तुम्हाला "अभंग" आवडल्याचे वाचून खुप खुप आनंद वाटतोय. असाच लोभ राहू दे. मनापासून खुप धन्यवाद.

    ReplyDelete
  4. Lina Kaku,
    Abhang khup chhan.....Agdi bhavpurn surekh mandla aahe. Klpana Kaushal

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद कल्पना, लिना फाटक

      Delete
  5. लीना ताई खूप छान अभंग आहे. दार खूप वेळ बंद राहो आणि तुमची अभंगवाणी आम्हाला अशीच ऐकायला मिळावी ही प्रार्थना

    ReplyDelete
  6. मनापासून खुप आनंद वाटतोय, असाच लोभ राहू द्यावा, लिना फाटक

    ReplyDelete
  7. ashwini huzurbazar27 July 2026 at 10:50

    देव आणि अंतराळाचं नातं, जन्म-मृत्यू हेच त्या घराचं एक दार ,ही खूप मौलिक आणि तितकीच तात्त्विक खोली असलेली आहे. एवढा गहन विचार अभंगाच्या पारंपरिक साच्यात इतक्या सहजतेने बसवला, हे विशेष कौतुकास्पद आहे.

    ReplyDelete
  8. मनःपूर्वक खुप खुप धन्यवाद आश्विनी. अभंग आवडल्याचे वाचून खूप आनंद वाटतोय. असाच लोभ राहो. लिना फाटक

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर