लेबनॉन: 'मध्यपूर्वेच्या पॅरिस'च्या मातीत हरवलेले काही दिवस
अश्विनी हुजुरबाजार
२०२३ च्या सुरुवातीला कामाच्या निमित्ताने काही महिने दुबईत राहण्याचा योग आला. दुबईच्या झगमगाटात आणि आधुनिक गगनचुंबी इमारतींच्या सावलीत दिवस चांगले जात होते. पण मनाच्या एका कोपऱ्यात एक नाव सतत रुंजी घालत होतं. ते शहर म्हणजे लेबनॉनची राजधानी, बैरुत.
हे नाव पहिल्यांदा गिरीशकडूनच ऐकलेलं. तो सांगायचा, त्याचे बाबा रेडिओवर जागतिक बातम्या ऐकत असत. त्यात लेबनॉनच्या यादवीच्या बातम्या त्यानेही ऐकल्या होत्या. त्या काळात बैरुत म्हणजे मध्यपूर्वेचं पॅरिस होतं.
तिथली फ्रेंच स्थापत्यकला, बुद्धिवंतांनी गजबजलेली कॅफे संस्कृती, भूमध्य समुद्राचा खारा वारा, हे सगळं आता केवळ कल्पनेत नको होतं. तिथल्या अस्थिर राजकीय परिस्थितीची धाकधूक होतीच. पण ब्रिटिश पासपोर्ट होता, व्हिसाची कटकट नव्हती. आणि काही गोष्टी वेळ आली की कराव्याच लागतात. आम्ही निघालो.
विमान उतरलं, आणि वास्तव समोर आलं
बैरुत विमानतळावर उतरताच जाणीव झाली, हे दुबई नाही. तिथे झगमगाट नव्हता, 'वेलकम' बोर्ड नव्हते. होते ते कडक नजरेचे सुरक्षा रक्षक आणि यु.एन.च्या पांढऱ्या गाड्या. आम्ही पर्यटक म्हणून आलो आहोत हे पाहून तेथील अधिकाऱ्याच्या भुवया उंचावल्या. "पर्यटन? इथे?" त्या नजरेतच सगळं होतं. आम्हीही क्षणभर एकमेकांकडे पाहिलं. पण पाय मागे घ्यायचे नव्हते. आणि त्याच क्षणी, त्या गजबजाटात, एक वेगळीच ऊर्जा जाणवली, या मातीत काहीतरी आहे, जे नकाशावरील धोक्याच्या खुणा सांगत नाहीत.
पहिला दिवस: बैरुत शहर
विमानतळावरून हॉटेलवर पोहोचलो तेव्हाच पहिला धक्का बसला. हॉटेलवाले शांतपणे म्हणाले, "फक्त अमेरिकन डॉलर्स चालतील, स्थानिक चलन नको." आम्ही एकमेकांकडे पाहिलं. लेबनॉनच्या आर्थिक संकटाची ही पहिली, थेट झलक होती.
दुपारी शहर फिरायला निघालो. सुरुवात केली बैरुतच्या सिटी सेंटरपासून. एकेकाळी मध्यपूर्वेतील सर्वात झगमगणारा व्यावसायिक भाग. पण आज ते चित्र वेगळं होतं. रस्ते ओसाड होते, उंच इमारती रिकाम्या उभ्या होत्या, जणू एखाद्या अर्धवट सोडून दिलेल्या स्वप्नासारख्या. २०२० च्या भीषण बंदर स्फोटाच्या आणि वर्षानुवर्षांच्या आर्थिक संकटाच्या खुणा इथे स्पष्ट दिसत होत्या.
त्याच परिसरात उभी आहे मोहम्मद अल-अमीन मशीद. निळ्या घुमटांची, भव्य आणि देखणी. तिच्या बाजूलाच जुनी मॅरोनाईट चर्च, सेंट जॉर्ज कॅथेड्रल. मशीद आणि चर्च शेजारी शेजारी उभ्या. हे दृश्य बैरुतच्या खऱ्या स्वभावाची ओळख करून देतं. एकेकाळी हे शहर वेगवेगळ्या धर्मांचं, संस्कृतींचं एकत्र नांदणं होतं. त्याची साक्ष आजही या दोन इमारती देतात.
कुठे हसणारी माणसं नाहीत, कुठे गजबज नाही. फिरता फिरता मनात एक अनामिक जडपणा दाटत होता. आम्ही पर्यटक होतो हे माहीत होतं. पण त्या रिकाम्या रस्त्यांवर मात्र 'आपण इथे यायला नको होतं का?' हा प्रश्न मनात डोकावत राहिला.
दुसरा दिवस: निसर्ग, श्रद्धा आणि सहस्र वर्षांचा इतिहास
जेइता गट्टो: पृथ्वीच्या पोटातील महाल
बैरुतपासून काही किलोमीटरवर असलेल्या जेइता गट्टोमध्ये शिरताच श्वास रोखला गेला. लाखो वर्षांपूर्वी चुनखडीवर कोरलेल्या नैसर्गिक मूर्ती, स्वच्छ निळ्या पाण्यावरून सावकाश जाणारी होडी, आत शिरताना वाटलं, आपण पृथ्वीच्या पोटात एका वेगळ्याच जगात आलो आहोत. माणसाने काहीही न केलेलं, निसर्गाने स्वतःच घडवलेलं हे शिल्प पाहून मन स्तब्ध झालं. हे जगाच्या सात नैसर्गिक आश्चर्यांच्या स्पर्धेत होतं आणि ते पाहिल्यावर का, ते कळतं.
हरिसा: ढगांवरील देवीचे दर्शन
त्यानंतर केबल कारने वर चढत गेलो, हरिसाला. वर जाताना खाली दिसणारं शहर हळूहळू लहान होत गेलं. 'आवर लेडी ऑफ लेबनॉन'च्या पांढऱ्याशुभ्र मूर्तीसमोर उभं राहिलो तेव्हा खाली जुनिह उपसागर निळ्या रंगात चमकत होता. ही मूर्ती लेबनॉनच्या ख्रिश्चन समुदायासाठी अत्यंत पवित्र आहे. १८०८ मध्ये स्थापन झालेलं हे तीर्थक्षेत्र मॅरोनाईट ख्रिश्चनांचं श्रद्धास्थान आहे. लेबनॉनमध्ये ख्रिश्चन, मुस्लीम आणि इतर समुदाय एकत्र नांदतात आणि हरिसा त्या सहजीवनाचं एक सुंदर प्रतीक आहे. आजूबाजूचे पर्वत, दूरवर पसरलेला भूमध्य समुद्र, त्या क्षणी मनात एकच विचार आला, या मातीवर इतकं प्रेम का असतं लेबनॉनच्या लोकांचं, ते इथे उभं राहिलं की समजतं.
बीब्लॉस: जिथे इतिहास श्वास घेतो
दिवसाचा शेवट झाला बीब्लॉसमध्ये. जगातील सर्वात जुन्या वस्त्यांपैकी एक, सुमारे सात हजार वर्षांचा इतिहास असलेलं हे शहर. इथे फोनिशियन काळातील मंदिरांचे अवशेष आहेत, इ.स.पू. २८०० वर्षांपूर्वीचे. त्या दगडांसमोर उभं राहिलं की आपण किती क्षुल्लक आहोत हे जाणवतं. त्याच परिसरात एक छोटं रोमन
amphitheatre आहे, समुद्राकडे तोंड करून उभं. कुणी नाही, आवाज नाही, फक्त लाटांचा नाद आणि त्या जुन्या दगडी रांगा.
बीब्लॉसची सर्वात मोठी देणगी मात्र लिपी. फोनिशियन लोकांनी याच भूमीतून जगाला पहिली वर्णमाला दिली, ज्या अक्षरांवर आज जगातील बहुतांश भाषांची लिपी उभी आहे. आपण जे अक्षर लिहितो, त्याचं मूळ इथेच आहे, हे जाणवलं तेव्हा अंगावर शहारा आला. संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात बीब्लॉस वेगळाच श्वास घेत होता.
तिसरा दिवस: सीमेवरचे धाडस, बालबेक आणि अंजार
रात्री झोपण्यापूर्वीच ठरलं होतं, उद्या बालबेक आणि अंजार. दुबईतील सहकाऱ्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं, " बालबेक पाहिल्याशिवाय लेबनॉन पाहिलं असं म्हणूच नकोस." अंजार म्हणजे सीरियाच्या सीमेपासून अवघ्या काही मैलांवर असलेलं शहर. मनात उत्सुकता होती, पण धडधडही होती.
सकाळी निघालो. रस्त्यात एक अमेरिकन पर्यटक भेटला. तो आदल्या दिवशी बालबेकला जाऊन आला होता. गप्पा निघाल्या, आम्ही विचारलं, " बालबेकला जाणं सुरक्षित आहे का?" तो थोडा हसला. "जा. फक्त आपल्या रस्त्याने जा, खरेदीच्या नादाला लागू नका, कशातही जास्त रस दाखवू नका." एवढा सल्ला पुरेसा होता.
अंजार: उमय्याद कालखंडाची शांत साक्ष
अंजारकडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा दृश्य बदलत गेलं. दोन्ही बाजूंनी शरणार्थी छावण्या दिसू लागल्या, ताडपत्रीच्या तंबूत राहणारी माणसं, लहान मुलं, धुळीने माखलेले रस्ते. सीरियन यादवीने उद्ध्वस्त झालेल्या हजारो कुटुंबांनी इथे आश्रय घेतला होता. मध्येच लष्करी चेकपोस्ट यायचे. सशस्त्र जवान, रणगाडे रस्त्याच्या कडेला उभे. आम्ही शांतपणे पुढे जात राहिलो. बोलणं कमी, नजरा सरळ.
अंजार म्हणजे सीरियाच्या सीमेपासून अवघ्या १० मैलांवर असलेलं एक छोटंसं गाव. इथे आठव्या शतकात उमय्याद खलिफा वलीद पहिला याने एक संपूर्ण शहर वसवलं होतं, राजवाडे, मशिदी, बाजारपेठा. आज त्याचे अवशेष उरले आहेत, पण ते बोलके आहेत. गर्दी नाही, आवाज नाही, फक्त उजाड भिंती आणि त्यांच्यावर उमटलेला काळाचा ठसा. त्या चौकोनी बांधकामातून एक सुनियोजित, समृद्ध शहराची झलक दिसते, जे काळाने गिळलं, पण पूर्णपणे नाही. बालबेकच्या भव्यतेच्या आधी अंजारची ही शांतता मनाला एक वेगळाच स्थिरपणा देऊन जाते.
बालबेक: ज्याचं वर्णन शब्दांत होत नाही
बालबेकला पोहोचलो आणि थक्क झालो. रोमन साम्राज्याने इ.स. पहिल्या शतकात
बांधलेली ती अवाढव्य मंदिरे, बृहस्पतीचं,
बॅकसचं, व्हीनसचं.
त्यांचे ते उंच उंच स्तंभ आभाळाला भिडताना पाहून मनात एकच प्रश्न येतो, हे कसं
शक्य होत. बृहस्पतीच्या
मंदिराचे काही स्तंभ तब्बल २२ मीटर उंच आहेत आणि प्रत्येक दगड इतका अचूक बसवलेला की आजचे अभियंतेही थक्क होतात. कोणतंही यंत्र
नाही, क्रेन नाही,
तरी हे घडलं. बालबेक च्या
पायथ्याशी असलेला एक न उचललेला प्रचंड दगड 'हाजर अल-हिब्ला'
आजही जमिनीत रुतलेला आहे. त्याचं वजन
आहे जवळपास एक हजार टन.
त्या दगडांवर हात ठेवताना जाणवलं, हे केवळ बांधकाम नाही. हे एक युगाचं स्वप्न होतं, दगडात साकारलेलं. आणि ते स्वप्न आजही, हजारो वर्षांनंतरही, तसंच उभं आहे.
परत येताना...
विमानात बसताना एकच जाणवलं, लेबनॉन हे केवळ एक देश नाही. ती एक भावना आहे. तिथला प्रत्येक दगड, प्रत्येक रस्ता, प्रत्येक माणूस तुम्हाला सांगत असतो, जगणं म्हणजे नुसतं टिकणं नाही, ते सौंदर्याने, इतिहासाने आणि जिद्दीने जगणं असतं.
पण विमान वर जाताना मन जड झालं. खाली दिसणाऱ्या त्या शहराकडे पाहताना डोळे भरून आले. हे लोक किती सहन करत आहेत, एकीकडे आर्थिक संकट, दुसरीकडे राजकीय अस्थिरता, आणि त्यात भर म्हणून मध्यपूर्वेतील युद्धाच्या ज्वाला दिवसेंदिवस जवळ येत आहेत. ज्या रस्त्यांवर आम्ही निर्धास्तपणे फिरलो, त्याच रस्त्यांवर इथले सामान्य माणसं उद्याची खात्री नसताना जगत आहेत.
जेइता गट्टोमध्ये भेटलेला तो हसतमुख गाईड, बायब्लोसच्या कॅफेमधला तो म्हातारा माणूस, बैरुतच्या ढिगाऱ्यांशेजारी चित्र रंगवणारा तो तरुण, हे सगळे चेहरे आठवतात. त्यांनी आमच्याशी कधीही तक्रार केली नाही, कधीही हार मानलेली दिसली नाही. पण त्यांच्या डोळ्यांत एक थकवा होता, जो शब्दांत सांगता येत नाही.
बालबकचे ते उंच स्तंभ डोळ्यांसमोरून जात नाहीत अजून. हजारो वर्षे टिकलेले ते दगड आजही उभे आहेत, युद्धांनंतरही, संकटांनंतरही. कदाचित तेच या मातीचं खरं प्रतीक आहे. बैरुत आता माझ्यासाठी केवळ एक हळवी हुरहूर नाही, तर एक मनापासून येणारी प्रार्थना बनून राहिलं आहे, या शहरासाठी, या माणसांसाठी, या मातीसाठी.
- अश्विनी हुजुरबाजार, यु. के.







आपण लेबनॉनवर लिहिलेला लेख अत्यंत हृदयस्पर्शी आणि माहितीपूर्ण आहे. तुम्ही दोघांनी लेबनॉनला जाण्याचे धाडस केले, हे खूप कौतुकास्पद आहे.
ReplyDeleteखरोखरचं न्यूजवर आजचे लेबनाॅन बघतांना एकेकाळी सुख, समृद्धी आणि शांततेत नांदणारा हा देश आणि तेथील लोक यांच्यासाठी जीव कळवळतो आणि नकळत मन त्यांच्यासाठी प्रार्थना करतं.
तुम्ही तुमचा हा अविस्मरणीय अनुभव आमच्यासोबत इतक्या सुंदर शब्दांत शेअर केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. तसेच या उत्कृष्ट लेखासाठी तुमचे हार्दिक अभिनंदन.
तुमच्या मनापासूनच्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभार. लेबनॉनबद्दलचा तोच कळवळा आम्हालाही तिथे जाणवला, आणि तो शब्दांत उतरवण्याचा प्रयत्न केला. तो तुमच्यापर्यंत पोहोचला हे वाचून खूप बरं वाटलं. धन्यवाद आणि शुभेच्छांबद्दल आभार!
DeleteAshwini अप्रतिम लिहिला आहेस. Bairut ची सद्य स्थिती डोळ्यासमोर उभी राहिली. अशीच लिहित राहा. ❤️❤️❤️
ReplyDeleteखूप छान 👌🏻
ReplyDeleteअप्रतिम लेख अश्र्विनी...बैरूत दर्शनाचा लाभ घेता आता वाचताना...
ReplyDeleteHi, लेबनॉन चे प्रत्यक्ष वर्णन करणारा लेख खूपच छान ,तुझ्या travel journeys बद्दल बरंच काही वाचायला नक्कीच आवडेल!!
ReplyDeleteखूप छान लिहिला आहेस
ReplyDeleteखूपच छान लिहिलं आहेस. पहिला लेख आहे असं वाटतच नाही .सुसंगत .डोळ्यासमोर चित्र उभी राहिली .प्रत्यक्ष तिथेच आहोत असं वाटलं .👌👌👍
ReplyDeleteखूप छान लिहितेस अश्विनी .
ReplyDeleteअभिनंदन आणि शुभेच्छा ❤️
This is so well written 👏
ReplyDeleteWa wa khup chan lekh👏👏👏👏
ReplyDeleteBrilliantly written Ashwini.. I could picture it when I was reading it … hopefully there will be peace one day and all suffering will end. 🤞🏻
ReplyDeleteअश्विनी प्रवासवर्णनाचा लेख छान आहे . माहितीतून देश डोळ्यापुढे उभा रहातो . तुझ्याकडे लेखन शैली आहे ! असे आणखी लेख लिही . अभिनंदन
ReplyDeleteसिरिया, लेबनन, पॅलेस्टीन हा माझ्या अल्प माहिती प्रमाणे खुप अशांत भाग, जिथे निर्वासितांच्या छावण्या व खुप भव्य वास्तू, आपल्या भारतात बऱ्याच ठिकाणी काव्य शास्त्र, विनोद, कला प्रांत याला बराच वाव आहे, त्यामुळे आपल्या इथली काही शहरे विविध प्रकारच्या कलांच्या करिता सुप्रसिद्ध आहेत, तसें काही तिकडे नाही, तरी अशा ठिकाणी पर्यटक म्हणून जाणे त्याप्रमाणात बरेच बेताचे, परंतू प्रचंड कुतूहलापोटी जाणे घडले असावे असे वाटतें .
ReplyDeleteअश्विनी,मस्तच लिहिलाय पहिला लेख !
ReplyDeleteलेबनाॅनला न जाताही प्रत्यक्ष बघतोय असाच अनुभव येत होता.
पहिल्या लेखासाठी तुझे
मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभाशीर्वाद.
पहिलाच लेख तोही प्रवास वर्णन..फारच छान लिहिलाय. सोबत छायाचित्र असल्यामुळे वाचताना डोळ्यासमोर देशाची प्रतिमा उभी रहाते. अश्विनी अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा न भेटलेल्या उषा मावशी कडून...
DeleteThank you so much
Deleteखूप सुंदर प्रवास वर्णन. Danger zone चा अनुभव खूप छान लिहिला आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
ReplyDeleteStonehenge सारखे दगड केवळ त्यांचा गवगवा केल्यामुळे पाहिले जातात आणि काही प्रेक्षणीय दगड केवळ राजकीय अस्थिरतेमुळे आणि भीती पोटी उपेक्षित राहतात. त्यांचे दर्शन शब्दातून घडवल्याबद्दल धन्यवाद.
ReplyDeleteधन्यवाद . प्रसिद्धीचा झोत कुठे पडतो यावरच अनेकदा एखादं ठिकाण "बघण्यासारखं" आहे की नाही हे ठरतं, बाकी त्याच्या सौंदर्याशी किंवा महत्त्वाशी काही संबंध नसतो. अशा दुर्लक्षित पण तितक्याच सुंदर जागा शब्दांतून तुमच्यापर्यंत पोहोचवता आल्या, याचं खूप समाधान वाटलं.
Deleteखूपच छान वर्णन आणि पश्चिमाईतआहेत लेखन केल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
ReplyDeleteधन्यवाद . हा अनुभव लिहून शेअर करण्याची संधी दिल्याबद्दलही मनापासून आभार
Deleteलेबनॅान चे प्रवास वर्णन खूपच सुन्दर आ णि हृदयस्पर्शी लिहिले आहे!
ReplyDeleteलेबनॉन ला जाण्याचे धाडस करणे हे खरोखर अविश्वसनीय आहे!! खूप छान
ReplyDeleteअश्विनी खूप छान लिहिले आहेस . एकतर तिथे जाणे हेच मोठे धाडस ! वाचक वाचताना त्यात गुंतून जातात .
ReplyDelete